- जयंत धुळपअलिबाग : आंग्रेकालीन काळंबा देवी ही केवळ अलिबागची ग्रामदेवताच नाही तर अलिशाह दर्गा, प्राचीन बालाजी मंदिर आणि काळंबादेवी मंदिर अशा अनोख्या हिंदू-मुस्लीम एकात्मतेच्या संगमाची प्रचिती देणारे हे स्थान आहे. सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांची असीम श्रद्धा असलेली आणि आंग्रे घराण्याची कुलदेवता काळंबा देवी ही अलिबागकरांची रक्षणकर्ती असल्याची पूर्वापार श्रद्धा येथे आहे.काळंबादेवीचा रोचक इतिहास सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या नवव्या पिढीचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी उलगडला. मूळ काळंबादेवी हिराकोट किल्ल्यामध्ये होती. ब्रिटिश राजवट अलिबागमध्ये आल्यावर या किल्ल्याचे रूपांतर कारागृहात झाले. तेव्हा देवीच्या पूजा, उत्सव, दर्शनाच्या निमित्ताने मराठ्यांचा किल्ल्यात वावर नको, या हेतूने ब्रिटिशांनी किल्ल्यातील काळंबादेवीची शिळा किल्ल्याबाहेर काढण्याचा निर्णय घेतला.थळच्या समुद्रातून आली काळंबादेवीदेवीने दृष्टांत देवून मी थळजवळच्या समुद्रात असल्याचा दृष्टांत दिला. तत्कालीन कोळी बांधवांनी समुद्रात शोध घेतला तेव्हा जाळ्यात काळंबादेवीची रेखीव पाषाणी मूर्ती सापडली. हिराकोट किल्ल्यातील देवीची शिळा आणि थळच्या समुद्रात सापडलेली काळंबादेवीची मूर्ती यांची अलिबाग शहराच्या तत्कालीन सीमेवर आणि आजच्या बालाजी नाक्यावर मंदिर बांधून सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांनी स्थापना केली.दूरदृष्टीचा एकात्मता संगमसरखेल कान्होजीराजे आंग्रे यांनी काळंबादेवीच्या मंदिराकरिता हीच जागा निवडण्यामागे मोठी दूरदृष्टी होती. अलिशाह दर्ग्याशेजारीच काळंबादेवीचे देऊळ झाले तर अलिबागमधील हिंदू आणि मुस्लीम बांधवांची नियमित भेट होईल, संवाद होईल आणि धार्मिक एकोपा निर्माण होईल, अशी त्यामागची कल्पना होती. जी खऱ्या अर्थाने वास्तवात उतरून अलिशाह दर्गा आणि काळंबादेवीचा हा बालाजी नाका अलिबागमधील हिंदू-मुस्लीम बांधवांचा गेल्या कित्येक पिढ्यांचा एकात्मतेच्या संगमाचा नाका बनला आहे.काळंबा देवीचा नवरात्रौत्सवअलिबाग सीमेवरील काळंबादेवीच्या चारही बाजूने अलिबाग शहर विस्तारत गेले. आंग्रे सरकारच्या काळात सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांनी मंदिरास इनाम दिले आणि त्यातून मंदिराचे कामकाज सुव्यवस्थित चालत असे. क्रमवंत हे त्याकाळी मंदिराचे मुख्य उपाध्याय होते तर त्यांच्या हाताखाली रामनाथ येथील गुरवांची नियुक्ती करण्यात आली होती. आजही गुरव परंपरा अखंड सुरू असून त्यांच्या माध्यमातून नवरात्रीत मंदिरात घटस्थापना करण्यात येते.
हिंदू-मुस्लीम एकात्मतेच्या संगमाचे प्रतीक; अलिबागची ग्रामदेवता काळंबा देवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 12:31 AM