तेजसचा सातव्या दिवशी शोध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 02:18 AM2017-07-29T02:18:46+5:302017-07-29T02:18:46+5:30
तालुक्यात अनेक धबधबे आहेत आणि ते नेहमीच पर्यटकांचे आकर्षण बनले आहेत. भिवपुरी स्थानकापासून जवळच असलेल्या आषाणे धबधब्यावर मुंबईचे लाखो पर्यटक वर्षा सहलीसाठी येत असतात
कर्जत : तालुक्यात अनेक धबधबे आहेत आणि ते नेहमीच पर्यटकांचे आकर्षण बनले आहेत. भिवपुरी स्थानकापासून जवळच असलेल्या आषाणे धबधब्यावर मुंबईचे लाखो पर्यटक वर्षा सहलीसाठी येत असतात. या धबधब्यातून पडणाºया पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या १३ वर्षांच्या तेजस बोराडे या मुलीचा सातव्या दिवशी शोध लागला नाही. तिला शोधण्याचा प्रयत्न कर्जत तालुक्यातील प्रशासन करत आहे. मात्र, त्यांना अद्याप यश आले नाही.
आषाणे धबधब्यावर मुंबई येथील किरण बोराडे आपल्या इतर १२ नातेवाइकांसह शनिवार, २२ जुलै रोजी आले असता, आषाणे धबधब्याचा ओढा पार करत असताना तेजस बोराडे ही तेरा वर्षांची मुलगी डोंगरकाठी पडणाºया पावसाचा अचानक लोंढा आल्याने गडबडली. मग आईचा हात सोडून वडिलांचा हात पकडायला गेली आणि पाय घसरून पाण्याच्या लोंढ्यात वाहू लागली. वडील किरण बोराडे तिला वाचवण्यासाठी धावले. मात्र, तेही तेजसबरोबर वाहून गेले.
२२ जुलैला पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर किरण बोराडे यांचा मृतदेह पाच कि.मी. लांब पाण्यात मिळाला.