अलिबाग : तालुक्यातील सरकारी जमिनींवर अनधिकृत भराव करून तेथील कांदळवनांची कत्तल करण्याच्या सर्रास घटना घडत आहेत. त्यांना अभय न देता त्यांच्यावर तातडीने पोलिसांत तक्र ार दाखल करावी, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी अलिबागच्या तहसीलदारांकडे केली आहे. त्यामुळे अनधिकृत भराव करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.अलिबाग तालुक्यातील अनधिकृत भरावांबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी प्रशासनाकडे वारंवार तक्र ार केली होती. शहाबाज येथे पीएनपी कंपनीने, बेलकडे येथे अलिबाग तालुका मीठ उत्पादक संस्थेने, रेवदंडा मोठा कोळीवाडा येथे संजय हवालदार यांनी सीआरझेडमध्ये येणाऱ्या सरकारी जागेत अनधिकृत मातीचा भराव करून अतिक्रमण केले आहे. हे तहसीलदारांच्या कागदपत्रांवरून सिध्द होत आहे. मग या व्यक्तींविरोधात तहसीलदार पोलिसांत तक्र ार दाखल करण्याचे आदेश का देत नाहीत असा प्रश्न सावंत यांनी १८ मार्चच्या तक्र ार अर्जात केला आहे. तहसीलदारांनी या अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिसांत गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी सावंत यांनी केली आहे. तहसीलदारांनी विहित मुदतीत सरकारच्या १० आॅक्टोबर २०१३ च्या परिपत्रकामध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे अपिल करण्यात येईल, असे सावंत यांनी सांगितले. सरकारचे १० आॅक्टोबर २०१३ च्या परिपत्रकानुसार तहसीलदार अलिबाग यांनी अलिबाग कोळीवाडा येथील अनधिकृत भरावाबाबत अज्ञात व्यक्तींविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यामध्ये ३ डिसेंबर २०१६ ला तक्र ार दाखल केली आहे. अशीच तक्र ार शहापूर-शहाबाज येथील अनधिकृत भरावाबाबत दाखल करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी शहापूर यांना तहसीलसदारांनी आदेशीत केले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात प्रशासनाने कंपनीला १६ लाख ३३ हजार ७६ रु पयांचा दंड डिसेंबर २०१६ मध्ये ठोठावला होता. ही दंडात्मक रक्कम तत्काळ सरकारकडे जमा केली नाही तर पीएनपी कंपनीविरुध्द महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ अन्वये पुढील कारवाई करण्याची नोटीसही पीएनपीला बजाविली होती. याचा अर्थ त्यांना आरोपी माहिती आहेत. मग त्यांना अभय का दिले जाते, असा प्रश्न सावंत यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
भराव करणाऱ्यांवर कारवाई करा- सावंत
By admin | Published: March 20, 2017 2:14 AM