आविष्कार देसाई अलिबाग : रायगड जिल्ह्यातील रेतीमाफियांवर जिल्हा खनिकर्म विभागाने वक्रदृष्टी करून ९२ प्रकरणात ४३ लाख ३५ हजार ८८२ रुपयांचा दंड वसूल केला आहे. यासंदर्भात १९ गुन्हे दाखल करताना २६ आरोपींना अटक करण्यात आली, तर ३५ वाहने जप्त करण्यात आली होती. रेतीचे अवैध उत्खनन करणाºयांवर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या पथकाकडून धाडी टाकण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा खनिकर्म विभागाच्या प्रमुख महिला अधिकारी अफरोज बेग यांनी दिला आहे.सरकारची रॉयल्टी बुडवून नैसर्गिक साधन संपत्तीची विल्हेवाट लावणाºयांवर कारवाईचा आसूड ओढण्यात येणार आहे.जिल्ह्यातील उरण, पनवेल, खालापूर या तालुक्यांमध्ये विकासकामे सुरू आहेत. त्याचप्रमाणे लगतच्या नवी मुंबई, पुणे जिल्ह्यातही विकास सुरू आहे. त्यामुळे बांधकामासाठी लागणारी रेती ही रायगड जिल्ह्यातून पुरवली जाते. जिल्ह्यमध्ये हे रॅकेट मोठे असल्याने बोलले जात आहे. आधीही विविध अधिकाºयांना रेतीमाफियांकडून मारहाण, अंगावर वाहन नेणे, काही अधिकाºयांना तर गन पॉइंटवरही घेतल्याची उदाहरणे जिल्ह्यात घडली आहेत. त्याचप्रमाणे रेती उत्खनन करणाºयांमध्ये मतभेद होऊन वाद झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.जिल्हा खनिकर्म विभागाने रेतीचा लिलाव पुकारला होता मात्र त्याला प्रतिसादच आला नाही.अवैध रेती उत्खननाने सरकारला फार मोठा आर्थिक फटका बसत आहे. तसेच नैसर्गिक साधन संपत्तीचीही लूट होत आहे, असे बेग यांनी सांगितले. पारंपरिक पध्दतीने रेती उत्खनन करणाºयांसाठी प्रशासनाने रीतसर परवानगी दिलेली आहे. त्यामध्ये तळा आणि रोहा तालुक्याचा समावेश आहे. तेथे प्रत्येकी ६०० ब्रासची परवानगी देण्यात आल्याचे बेग यांनी सांगितले.२०१७-१८ या कालावधीत ९२ प्रकरणात ४३ लाख ३५ हजार ८८२ रुपयांचा दंड वसूल केला आहे. १९ गुन्हे दाखल करताना २६ आरोपींना अटकही करण्यात आली, तर ३५ वाहने जप्त करण्यात आली होती. त्यामध्ये महाड तालुक्यातील सर्वाधिक १६ प्रकरणांचा समावेश आहे. त्यामध्ये १२ लाख ३२ हजार ६२५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. तीन गुन्हे दाखल केले होते. दोन बोटी उद्ध्वस्त करण्यात आल्या होत्या, तर तीन संक्शन पंप नदीच्या पाण्यात बुडवण्यात आले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अवैध रेती उत्खननावर कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 1:16 AM