श्रीवर्धन : आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आपली सर्वांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. प्रत्येकाने कटाक्षाने आपले नियमकर्तव्य पार पाडणे अगत्याचे आहे. कुठेही गैरप्रकार घडणार नाही याची सर्वांनी दखल घ्यावी. कोणताही गैरप्रकार आढळल्यास त्वरित कारवाई करावी, अशा सूचना रवींद्र सिंग यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या.श्रीवर्धन तालुक्यातील निवडणूक निरीक्षकांच्या एकदिवसीय दौºयात सिंग यांनी जनजागृती वाहनाचे उद्घाटन केले. तसेच सुरक्षेची पाहणी केली. श्रीवर्धनमधील तीन मतदान केंद्रास भेट दिली. तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना सिंग यांच्या हस्ते निवडणूक ओळखपत्राचे वाटप करण्यात आले.सिंग यांनी मतदार कार्यालयप्रमुख व क्षेत्रीय अधिकारी यांना मार्गदर्शन केले. निवडणूक कामादरम्यान शिस्त व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तुम्ही केलेल्या योग्य कारवाईस निवडणूक आयोगाचे समर्थन असेल, असे सिंग यांनी सांगितले. निवडणूक प्रसंगी प्रत्येक व्यक्तीने वेळेवर आपल्या कार्यक्षेत्रात पोहोचणे अगत्याचे आहे. आपण सर्वांनी एकत्र मिळून काम केल्यास आगामी लोकसभा निवडणूक कार्यक्रम आपण यशस्वी करू, असे रवींद्र सिंग यांनी सांगितले.प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी केलेल्या कामाचा तपशील निवडणूक निरीक्षक सिंग यांच्या समोर सादर केला. प्रत्येक घटकास काम व्यवस्थित पार पाडण्यासाठी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी केले. तर दिव्यांग जनजागृतीसाठी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात शालेय विद्यार्थीवर्गाने पथनाट्य सादर केले.
गैरप्रकारांना पायबंद घालण्यासाठी योग्य कारवाई करा- निवडणूक निरीक्षक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 11:56 PM