रोहा : अल्पवयीन गतिमंद मुलीवर अत्याचार करणाºयावर त्वरित कारवाई करा, या प्रकरणात दिरंगाई करणाºया दोषी पोलिसांवर तातडीने कारवाई करा, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा अॅॅड. माधवी नाईक, जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली रोह्यात मोर्चा काढून उपविभागीय पोलीस अधिकारी, रोहा यांना निवेदन दिले.
शहरात गतिमंद मुलीवर ५५ वर्षीय नराधमाने अत्याचार केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ केली. जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर अखेर गुन्हा नोंदविण्यात आला. पीडितेला न्याय देण्याऐवजी प्रकरण दडपण्यासाठी तिच्या कुटुंबीयांना पैशाचे प्रलोभन दाखविले गेले. तिला न्याय देण्यासाठी पुढे आलेल्या तरुणांना पोलिसांनी धमकीवजा नोटिसा बजावल्या. याविरोधात आवाज उठवण्यासाठी भाजपच्या वतीने शुक्रवारी मोर्चा काढला.
रोह्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांना निवेदन दिले. या वेळी पनवेलच्या महापौर कविता चौतमल, जिल्हा युवक अध्यक्ष अमित घाग, राज्य कार्यकारिणीचे संजय कोनकर, तालुकाध्यक्ष सोपान जांभेकर, मेघना ओक, जयश्री भांड, श्रद्धा घाग, ज्योती सनीलकुमार आदी उपस्थित होते. शहरातील राम मारुती चौकातून मोर्चा सुरू झाला. तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.