- आविष्कार देसाई
रायगड : तळीये दरड दुर्घटनेत आतापर्यंत 49 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत, आज दिवसभरात 10 मृतदेह बाहेर काढण्यात आले.तळीयेमध्ये मृतदेह बाहेर काढताना कोणाचे हात तर कोणाचे पाय अशा छिन्न विच्छिन्न अवस्थेत मृतदेह सापडत होते. त्यामुळे बचाव कार्य थांबवा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. मात्र मृतांचे नातेवाईक यांनी बचाव कार्य थांबवा, असे संमती पत्र लिहून दिल्यास बचाव कार्य थांबण्यात येईल, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
कोणाची हात मान पाय सापडत आहेत. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश वाढत होता. मृतदेहाची अवहेलना पाहवत नव्हती, त्यामुळे या पुढे बचाव कार्य थांबवण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. शनिवारी आणि रविवारी केली होती. मात्र 85 मृतदेह हाती लागत नाहीत, तोपर्यंत बचाव कार्य सुरूच राहणार, असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले होते, त्यामुळे आज दिवसभर ग्रामस्थ संभ्रमात होते.
सायंकाळी साडेसहा वाजता चौधरी घटनास्थळी आल्या, त्यांनी बचाव कार्य सुरू असलेल्या ठिकाणी गेल्या, त्यानंतर ग्रामस्थांनी त्यांची भेट घेतली, आमच्या गावातील मृत्यू पावलेल्या नागरीकांची अवहेलना पाहवत नाही, ढिगाऱ्याखालून कोणाचे हात तर कोणाचे पाय भेटत आहेत, कृपया बचाव कार्य थाबवा अशी मागणी ग्रामस्थांनी केली, सरकारी मदत अन्य लाभ मिळण्यासाठी मृत देह मिळणे आणि त्याची ओळख पटणे गरजेचे आहे, त्यामुळे आम्हाला शेवटपर्यंत प्रयत्न करायचा आहे.
चमत्कार होऊन एखादा माणूस जीवंत सापडला तर, त्याचे जीव वाचू शकतात, असे चौधरी यांनी सांगितले. त्यानंतर स्थानिक आमदार भरत गोगावले तेथे आले. त्यांनी ही ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थ ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मृतांचे नातेवाईक आणि ग्रामस्थ यांनी प्रशासनाला संमती पत्र लिहून दिले तर बचावकार्य उद्यापासून थांबण्यात येईल, असे चौधरी यांनी सांगितले.