- आविष्कार देसाई
रायगड : महाड तालुक्यातील तळीये येथील दरड दुर्घटनेत तब्बल 53 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बेपत्ता असणाऱ्या 31 जणांना जिल्हा प्रशासनाने आज मृत घोषित करुन बचाव कार्य संपल्याचे जाहिर केले. नैसर्गिक आपत्तीमध्ये तब्बल 84 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे, तर पाच जण जखमी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
महाड तालुक्यातील तळीये येथे 22 जुलैला अतिवृष्टीमुळे दरड कोसळली होती. या दरडीमध्ये 84 नागरिक अडकल्याची भिती व्यक्त करण्यात आली होती. 23 जुलै रोजी प्रशासनाने एनडीआरएफ, एसडीआरएफ, टीडीआरएफ आणि 12 स्थानिक बचाव पथकांच्या सहायाने बचावकार्य सुरु केले होते. रविवारी रात्री उशिरापर्यंत 53 मृतदेह काढण्यात आले होते. 31 जण बेपत्ता होते. बेपत्ता नागरिकांचा शोध घेत असताना मातीच्या ढिगाऱ्यातून कोणाचे हात, पाय, डोके, धड असे सापडत होते. त्यामुळे मृतांच्या शरिराची विंटबना थांबवा अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरील होती. रविवारी याबाबत बैठक झाली.
मृतांच्या नातेवाईकांनी, ग्रामस्थांनी संमतीपत्र दिल्यावरच बचावकार्य थांबवण्यात येईल, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार सोमवारी दुपारी एनडीआरएफ, एसडीआरएफ, टीडीआरएफचे मत आणि बेपत्ता झालेल्या नातेवाईकांच्या भावना जाणून घेण्यात आल्या.सर्वसमावेशक निर्णय घेऊन बचाव कार्य थांबवण्यात येत असल्याची घोषणा जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केली.