- आविष्कार देसाई
रायगड : अनेक तास जेसीबीच्या सहायाने मातीचे ढिगारे उपसले जात होते. हात, पाय, मान, धड तर कोणाचे डोके सापडत होते. सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. बचाव पथकातील जेसीबी चालकाला तर अशरशः उलट्या झाल्याने तळीयेमध्ये किती भयान परिस्थिती आहे याची जाणीव होते. तळीये दरड दुर्घटनेला आज पाच दिवस झाले आहेत.
रविवारी रात्री उशिरापर्यंत तब्ब्ल 53 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. बेपत्ता असलेल्या 31 नागरिकांना जिल्हा प्रशासनाने मृत घोषित केले आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 84 वर गेला आहे. रविवारी बचावकार्य करताना जेसीबीच्या सहायाने माती उपसण्यात येत होती. अधून-मधून पावसाचा मारा सुरुच होता. मृतदेह बाहेर काढण्यात येत असताना मृतांच्या नातेवाईकांच्या किंकाळ्या, आरोळ्यांनी तळीये गाव हादरुन गेले होते. दुपारनंतर बचाव कार्य सुरु असताना मातीतून डोक, धड, हात, पाय असे अवयव बाहेर पडत होते. चार दिवस झाल्याने मृतदेह सडलेल्या अवस्थेत मिळत होते. त्यामुळे खूप दुर्गंधी सुटली होती.
जेसीबी चालकाने तर अक्षरशः उलट्या केल्या. त्यामुळे बचाव पथकातील अन्य सहकाऱ्यांच्या अंगावरही काटा उभा राहीला. त्याच परिस्थितीमध्ये बचाव पथक मृतदेह कपड्यामध्ये बांधून स्ट्रेचरवर ठेवत होते. तेथून पंचनामा झाल्यावर जवळच असणाऱ्या मोकळ्या जागेत पुरण्यात येत होते. परिसरामध्ये बऱ्याच प्रमाणात दुर्गंधी पसरल्याने बचाव पथकाने औषधाची फवारणी केली. आपल्या अर्धवट अवस्थेत असणाऱ्या मृतदेहाला पाहण्यासाठी नागरिक हंबरडा फोडत होते.