Taliye Village: 'महाराष्ट्र दिनी' मिळणार तळीयेवासियांना नवी घरं; आणखी ६ महिने प्रतिक्षा करावी लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 09:56 AM2021-10-12T09:56:07+5:302021-10-12T09:57:29+5:30
तळीये गावात दरड कोसळल्यामुळे बेघर झालेल्या गावकऱ्यांचे 1 मे रोजी पुनवर्सन होणार असून, त्याच दिवशी येथील नागरिकांना घराच्या चाव्या देणार असल्याची माहिती शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी दिली आहे
मुंबई : वादळामुळे झालेल्या अतिवृष्टीत रायगड जिल्ह्यातील तळीये गावातील 32 घरे दरडीखाली गाडली गेली होती. या गावाचे पुनर्वसन म्हाडाकडून करण्यात येणार आहे असं सरकार प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. घरच दरडीखाली गेल्यामुळे या गावातील लोक हे तात्पुरत्या निवार्या खाली आजूबाजूला राहात होती. त्यामुळे या गावातील लोकांचे पुनर्वसन प्रशासन कधी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आता लवकरच या गावातील लोकांचे पुनवर्सन होणार आहे.
कधी होणार घरं ?
तळीये गावात दरड कोसळल्यामुळे बेघर झालेल्या गावकऱ्यांचे 1 मे रोजी पुनवर्सन होणार असून, त्याच दिवशी येथील नागरिकांना घराच्या चाव्या देणार असल्याची माहिती शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी दिली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पालकमंत्री, आमदार, तळीये गावचे सरपंच-उपसरपंच तसेच म्हाडाचे अधिकारी यांची बैठक झाली असून, 1 मे रोजी घराच्या चाव्या देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी दिली
आहे.
कशाप्रकारे घरं बांधणार ?
पाऊस गेला की आम्ही जिथे घर बांधली जाणार आहेत तिथे सपाटीकरण करणार आहोत. एवढेच नाही तर तीन गुंठे जागेत 600 स्केअर फुटाचे घर आम्ही देत असल्याचे गोगावले यांनी सांगितले. तसेच गावात केलेल्या पंचनाम्यानुसार योग्य त्या सोयीसुविधा देखील करण्यात येणार आहेत. अनेक वर्ष टिकतील अशी घरं प्रशासनाकडून तळीये गावकऱ्यांना मिळणार आहेत.
तसेच तळीये गावाचा पुनर्विकास करताना गावात अंगणवाडी, शाळा आणि आरोग्याची सुविधा म्हणून हॉस्पिटल ही बांधले जाणार आहे. सध्या तळीये गावाच्या पुनर्विकासातील घरं गुजरातच्या भूज येथील सिटेक कंपनीमध्ये तयार केली जात आहेत. काही दिवसात ही घरं मुंबईत आणली जाणार आहेत. नव्या तंत्रज्ञानाची ही घरे असणार आहेत. ज्या प्रकारे कोकणात वातावरण आहे. त्या सर्व वातावरणात ही घर टिकतील अशा स्वरूपाचे घर बनवण्याचे काम सुरू आहे.