तळोजा स्फोटप्रकरण: रामके कंपनीला अद्याप क्लीन चिट नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 04:47 AM2018-11-01T04:47:17+5:302018-11-01T04:47:43+5:30
औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाकडून कसून चौकशी सुरू
पनवेल : तळोजा एमआयडीसीतील रामके कंपनीत झालेल्या स्फोटाची औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाकडून कसून चौकशी सुरू आहे. आठवडाभरात ही चौकशी पूर्ण केली जाणार आहे, त्यामुळे रामके कंपनीला अद्याप क्लीन चिट दिली नसल्याचे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे सहसंचालक एम. आर. पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या घटनेची चौकशी करताना औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाने संबंधित रसायन कोठून आले? त्याची तीव्रता काय होती? कशा प्रकारे या रसायनाचे विघटन करण्यात आले? यासंदर्भात माहिती गोळा केली आहे. आठवडाभरात हा अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे.
तिसऱ्या दिवशी उशिरापर्यंत तळोजा पोलीस ठाण्यात या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. घटनेची सखोल चौकशी करण्यात येत असल्याची माहिती तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय लांडगे यांनी दिली.
रामके कंपनीतील काही कर्मचाºयांच्या सतर्कतेमुळे मोठी हानी टळल्याचे बोलले जात आहे. संबंधित स्फोट सर्व रसायन जमा केलेल्या जागेवर झाला असता, तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असती, अशी शक्यता औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे सहसंचालक एम. आर. पाटील यांनी व्यक्त केली.
भरपाईची मागणी
घटनेत नुकसान झालेल्या घरांना कंपनीने भरपाई द्यावी. अनेक घरांना तडे गेले असून, कंपनीचे प्रतिनिधी अद्याप आमच्या गावात पाहणी करायलाही आले नसल्याचा आरोप भोईरपाडा येथील रहिवासी पप्पू भोईर यांनी केला. येथील प्रदूषणामुळे जिवंतपणी मरणयातना भोगाव्या लागत असल्याने ही कंपनी बंद करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे यांनी या घटनेत नुकसान झालेल्या घरांची भोईरपाडा या ठिकाणी जाऊन पाहणी केली असून, अहवाल रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला आहे.