तळोजा एमआयडीसी दुर्घटना : ग्रामस्थांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे भोवले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 12:59 AM2018-10-30T00:59:33+5:302018-10-30T01:00:01+5:30
अनेक गावांमध्ये उमटले पडसाद, १५ किमी परिसरात जाणवले धक्के
- वैभव गायकर
पनवेल : तळोजा औद्योगिक वसाहतीमधील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट (रामके) या रासायनिक घनकचरा विघटन करणाऱ्या कंपनीत सोमवारी सकाळी केमिकल्सचे विघटन करताना मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे आजूबाजूचा दहा ते पंधरा किमीचा परिसर हादरला असून अपघातात एक जण गंभीर झाला आहे.
स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, अनेक गावांना हादरे बसले. विशेष म्हणजे केमिलकलचे विघटन करण्यासाठी वापरात असलेली जेसीबी मशिनदेखील स्फोटाच्या तीव्रतेने पलटी झाली. यात जेसीबी चालक संतोष पाटील जखमी झाला.
मुंबई वेस्ट मॅनेजमेंट (रामके) या कंपनीत नवी मुंबईसह मुंबई शहरातील रासायनिक कचºयावर प्रक्रिया करून त्याचे विघटन केले जाते. येथील रसायनिक प्रदूषणामुळे रहिवासी त्रस्त असून याबाबत अनेकदा तक्रारीही करण्यात आल्या आहेत, तसेच मोर्चे, निदर्शने, आंदोलनही करण्यात आले आहे. मात्र कंपनी प्रशासनामार्फत कोणतीच दखल घेतली जात नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
अतितीव्रतेच्या स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरल्याची नवी मुंबईतील ही पहिलीच घटना आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधित कंपनीवर कारवाईची मागणी केली आहे. नियमाचे उल्लंघन करून अनेकांचे जीव संकटात टाकल्याने कंपनी व्यवस्थापनाविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
रामके कंपनीमधील दुर्घटनेची माहिती मिळताच परिमंडळ दोनचे उपायुक्त अशोक दुधे, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेनेचे बबन पाटील, नगरसेवक हरेश केणी यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी रामके कंपनीत धाव घेतली. स्फोटाचे मुख्य कारण लपविण्यासाठी कंपनी प्रशासनाकडून विस्फोट झालेले ड्रम लपविण्यात आल्याचा आरोप यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी केला. रामके कंपनीतर्फे झालेल्या प्रकाराबद्दल खुलासा करण्यात आला नाही.
भोईरपाडा गावात स्फोटाचे सर्वांत जास्त पडसाद
रामके कंपनीलगत भोईरपाडा हे गाव आहे. या गावाला स्फोटाचा सर्वात जास्त तडाखा बसला आहे. गावात असलेल्या ३० ते ४० घरांना तडे गेले आहेत. अनेक घरांच्या खिडक्यांची तावदाने फुटली आहेत. स्वयंपाकगृहातील भांडी देखील पडली आहेत. सकाळी कामावर जाण्याच्या तयारीत असताना मोठा स्फोट झाल्याने घर हादरले, खिडक्यांच्या काचा फुटल्याने भूकंप झाल्याचा भास झाला. मात्र जीव वाचवण्यासाठी बाहेर पडल्यावर रामके कंपनीमधून धुराचे लोळ दिसल्याचे भोईरपाडा येथील रहिवासी पप्पू भोईर यांनी सांगितले.