पनवेल कोर्टाजवळ चिंचेचे झाड कोसळले, चार रिक्षा आणि एका कारचे मोठे नुकसान
By वैभव गायकर | Published: April 12, 2024 04:52 PM2024-04-12T16:52:19+5:302024-04-12T16:52:39+5:30
पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला या घटनेबाबत दुपारी 2 वाजुन 35 मिनिटांनी फोन केला. त्यानंतर तत्काळ अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
पनवेल: पनवेल न्यायालयाच्या परिसरात दि.12 रोजी मोठे चिंचेचे झाड उन्मळून कोसळल्याने चार रिक्षा आणि एका कारचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला या घटनेबाबत दुपारी 2 वाजुन 35 मिनिटांनी फोन केला. त्यानंतर तत्काळ अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये अग्निशमन दलाचे 6 जवान आणि वृक्ष प्राधिकरणाचे 10 कर्मचाऱ्यांनी त्वरित बचाव कार्य सुरु केले. साधारणतः साडेचारच्या सुमारास याठिकाणची परिस्थिती पूर्वपदावर आली. जेसीबी आणि कटरच्या सहाय्याने झाडाच्या तुटलेल्या फांद्या बाजुला करण्यात आल्या.या घटनेत रिक्षांचे आणि कारचे मोठे नुकसान झाले. पनवेल कोर्ट परिसरात नागरिकांची मोठी गर्दी असते. न्यायालयात येणारे पक्षकार आपल्या गाड्या या कोर्ट परिसरात झाडांच्या आडोशाला लावत असतात. प्रचंड उन्हात झाडाखाली सावलीत या गाड्या पार्क केल्या होत्या. मात्र अतिशय जुनाट असे हे झाड उन्मळून या गाड्यावर पडले. या घटनेमुळे मान्सूनपूर्व अशा धोकादायक झाडांची छाटणी करण्याची मागणी केली जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी धाव घेतली.रस्त्यावरील झाड बाजुला कारण्यासाठी काही काळ लोखंडी पाडा येथील रस्ता बंद करण्यात आला होता.या घटनेत गाड्यांचे नुकसान झाले आहे.सुदैवाने जीवितहाणी झाली नाही.
-संदीप पाटील (उप अग्निशमन केंद्र अधिकारी,पनवेल महानगरपालिका )