टेंबरे ग्रामपंचायतीचे विभाजन, दोन ग्रामपंचायती अस्तित्वात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 03:50 AM2018-08-26T03:50:01+5:302018-08-26T03:50:26+5:30
ग्रामपंचायतीवर प्रशासक : विनीता सावंत ठरल्या ऐन घटकेच्या सरपंच
कर्जत : कर्जत तालुक्यात टेंभरे ग्रामपंचायतीचे विभाजन झाल्यामुळे रजपे आणि जांबरुं ग या दोन नव्या ग्रापंचायती अस्तित्वात आल्या आहेत. तशी अधिसूचना शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून काढण्यात आली आहे.
तालुक्यात तीन हजार १७२ लोकसंख्या असलेली टेंभरे ग्रापंचायत होती. या ग्रामपंचायतीमध्ये टेंभरे, रजपे, शिंगढोळ, पेठ, जांबरुं ग या पाच गावांचा समावेश होता.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून अधिसूचना काढण्यात आली असून, टेंभरे ग्रामपंचायतीच्या जागी रजपे आणि जांबरुं ग या दोन ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या आहेत. रजपे ग्रामपंचायत रजपे, टेंभरे आणि शिंगढोळ या तीन गावांचा समावेश करण्यात आला आहे, तर जांबरुं ग ग्रामपंचायतीमध्ये जांबरुं ग आणि पेठ या दोन गावांचा समावेश आहे. टेंभरे ग्रामपंचायतीचे विभाजन करून रजपे आणि जांबरुं ग या दोन ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या आहेत, अशी अधिसूचना शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून १६ आॅगस्ट रोजी काढण्यात आली आहे.
२४ आॅगस्ट रोजी गटविकास अधिकारी बालाजी पुरी यांनी टेंभरे ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी सुनील अहिरे यांची नेमणूक केली आहे. त्यामुळे आजपासून पुढील काळापर्यंत ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकाच्या मार्फत चालणार आहे.
टेंभरे ग्रामपंचायतीची निवडणूक
च्२४ आॅगस्ट रोजी टेंभरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक लागली होती. या निवडणुकीसाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच दीपाली प्रमोद पिंगळे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने ते पद रिक्त झाले होते, त्यासाठी शनिवारी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सरपंचपदासाठी एकमेव विनीता मंगेश सावंत यांचा अर्ज आल्याने त्या सरपंचपदी बिनविरोध निवडून आल्या. मात्र, ग्रामपंचायतीच्या विभाजनाची अधिसूचना आणि प्रशासकाची नेमणूक यामुळे विनीता सावंत ऐन घटकेच्या सरपंच ठरल्या आहेत.