विहिरीत टँकर ओतून पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:37 AM2018-04-29T00:37:31+5:302018-04-29T00:37:31+5:30
तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायत ताडवाडी-मोरेवाडी या गावातील आदिवासी लोकांना नंदकुमार भावसार हे गेल्या १२ वर्षांपासून उन्हाळ्यात पाणी पुरवित आहेत
कर्जत : तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायत ताडवाडी-मोरेवाडी या गावातील आदिवासी लोकांना नंदकुमार भावसार हे गेल्या १२ वर्षांपासून उन्हाळ्यात पाणी पुरवित आहेत. त्यांनी फार्म हाउससाठी बांधलेल्या विहिरीने तळ गाठला आहे. मात्र, या विहिरीत टँकरने पाणी ओतून ते आदिवासी बांधवांना पाणीपुरवठा करीत आहेत.
पाथरज ग्रामपंचायत हद्दीत ताडवाडी आणि मोरेवाडी, पाथरज या गावांमध्ये दरवर्षी पाणीटंचाई जाणवते. त्यातील पाथरज गाव हे डोंगरपाडा पाझर तलावाजवळ असल्याने त्यांची नळपाणी योजना तयार झाली आणि पाथराज गावातील महिलांना पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट थांबली आहे. त्यातच काही वर्षांपूर्वी डोंगरपाडा पाझर तलाव फुटल्याने परिसरातील तब्बल २५ गाव-वाड्यांत पाणी टंचाई निर्माण झाली होती. त्या वेळी भीमाशंकर रस्त्यावर असलेल्या जागेत फार्म हाउस उभारणाऱ्या नंदकुमार भावसार यांनी वैयक्तिक वापरासाठी एक ट्रँकर खरेदी केला. तो ट्रँकर ताडवाडी येथून वंजारवाडी येथे पेज नदीवर जाऊन पाणी आणून विहिरीत ओतून लोकांची पाणीसमस्या काही प्रमाणात सोडवण्यास सुरुवात केली. गेल्या १२ वर्षांपासून ते उपक्रम राबवत असून, त्यामुळे पाथरज ग्रामपंचायतीतील आदिवासी वाडे-पाड्यांमधील पाणीसमस्या काही प्रमाणात सुटली आहे.