म्हसळा : तालुक्यातील घोणसे घाटात पेट्रोल घेऊन जाणारा टँकर पलटी झाल्याने पेट्रोल चोरी करण्यासाठी नागरिकांनी जीव धोक्यात घातल्याची घटना समोर आली आहे. स्थानिक नागरिकांनी पेट्रोल चोरीसाठी चक्क ड्रम, बाटल्या, मिळेल ते हातात घेऊन धावपळ केली आहे. टँकरमध्ये जवळपास ८ हजार लीटर पेट्रोल आणि चार हजार लीटर डिझेल होते, यामधून चोरट्यांनी अंदाजे २ ते ३ हजार लीटर पेट्रोल व डिझेलवर डल्ला मारला. तर उर्वरित पेट्रोल व डिझेलपैकी ४ ते ५ हजार लीटर गळतीमुळे वाहून गेले आहे.
रविवारी सकाळी भारत पेट्रोलियम या कंपनीचा पेट्रोल व डिझेलने भरलेला टँकर रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील घोणसे घाटात चालकाला तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने पलटी झाला. हा टँकर पलटी झाल्याचे समजताच जवळपासच्या गावातील नागरिकांनी पेट्रोल चोरी करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून धावपळ केली. चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने अपघात झाला. या अपघातात टँकरचे चालक व क्लीनर किरकोळ जखमी झाले.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच म्हसळा तहसीलदार शरद गोसावी, सर्कल दत्ता कर्चे व पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे व त्यांचा कर्मचाऱ्यांनी क्रेनच्या मदतीने हा टँकर रस्त्याच्या बाजूला केला. मात्र, १००-२०० रुपयांच्या पेट्रोलच्या चोरीसाठी ग्रामस्थांनी आपला जीव धोक्यात घातला. उन्हामुळे या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता होती.