प्रकाश कदम ।
पोलादपूर : पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून तालुक्यातील १४ गावांनी प्रीवॉटर कप स्पर्धेसाठी सहभाग घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक गावात श्रमदानाचे काम सुरू करण्यात आले आहे. येत्या काळात या स्पर्धेच्या माध्यमातून ही सर्व गावे टँकरमुक्त करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कापडे बूथ येथे श्रमदान करून या कामाचा शुभारंभ केला.जिल्हाधिकारी स्वत: उपस्थित राहून श्रमदान करत असल्यामुळे ग्रामस्थांचा उत्साह वाढत असून, ग्रामस्थ मोठ्या संख्येने श्रमदानासाठी तयार झाले आहेत. लोकसहभागातून पाणीबचतीची चळवळ उभी राहण्यासाठी देवळे, आडावळे खुर्द, साळवी कोंड, गोवले, खांडज, बोरघर, वडघर बुद्रुक, कामथे, सडवली, काटेतळी, कापडे बुद्रुक, बोरावळे आणि ताम्हाणे या १४ गावांमध्ये प्रीवॉटर कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १० एप्रिल ते १५ मे या कालावधीमध्ये होणार आहे. यापूर्वी गावांमध्ये झालेल्या जलसंधारणाच्या कामांची श्रमदानातून दुरुस्ती करण्यात येणार आहे. या स्पर्धेदरम्यान, पोलादपूर तालुक्यातील नियोजित १४ स्पर्धक गावांमध्ये श्रमदानामधून समतल चर, वृक्ष लागवड, शोषखड्डे, गाळ काढणे आदी कामे करणार आहेत. मुंबई, सुरत व पुणे येथील नागरिकांच्या सहभागामुळे या स्पर्धेसाठी सर्वच गावांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. तालुक्यातील प्रत्येक गावातून जलसंधारणाची कामे वेगाने मार्गी लागल्यास पावसाचे पाणी त्या-त्या गावच्या शिवारातच अडेल. परिसरातील शेतीला त्याचा चांगला उपयोग होईलच; पण शिवारातील विहिरी, कूपनलिका यांनाही पाणी वाढून भूगर्भाच्या पाणीपातळीत वाढ होईल. त्या-त्या परिसरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल व पुढील दुष्काळाचा चटका जाणवणार नाही, असा विश्वास यानिमित्ताने ग्रामस्थांत निर्माण झाला आहे.या प्रकल्पाच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामाबरोबरच लोकांचे मनसंधारणाचे काम होत आहे. प्रीवॉटर कपच्या माध्यमातून गावच्या सामाजिक परिवर्तनाबरोबरच, टंचाईमुक्त व टँकरमुक्त गाव करण्याचा निर्धार डॉ. सूर्यवंशी यांनी या वेळी व्यक्त केला. याअगोदर मुख्य कार्यकारी अधिकारी यावलकर यांनी बोरघर ग्रामपंचायतीला भेट देऊन श्रमदान केले, तसेच कापडे येथील श्रमदानानिमित्त स्थानिक आमदार भरत गोगावले यांनी श्रमदान केले. तसेच राजिप माजी उपाध्यक्ष तथा राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे, पोलादपूर पंचायत समितीचे सभापती दीपिका दरेकर, उपसभापती शैलेश सलागरे, प्रांताधिकारी इनामदार, पोलादपूर तहसीलदार शिवाजी जाधव, महाड तहसीलदार पवार, गटविकास अधिकारी भूषण जोशी, मंडळ कृषी अधिकारी कैलास पाटील, महाड उत्पादक संघटना अध्यक्ष पाठारे, स्वदेश फाउंडेशनचे तुषार इनामदार, कापडे बु. सरपंच अजय सलागरे यांनी उपस्थित राहून श्रमदान केले. तसेच या श्रमदानात प्रिवी आॅर्गेनिक कंपनीचे २०० कर्मचारी सहभागी झाले होते, तसेच कापडे विद्यालयाचे विद्यार्थी, स्वदेशचे कार्यकर्ते, महसूल, पंचायत समितीचे कर्मचारी, कृषी विभाग सहभागी होऊन श्रमदान करत होते.स्पर्धक गावांतील ग्रामस्थांना प्रोत्साहनदाही दिशा पाण्यासाठी वणवण आणि दुष्काळ परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘पाणी आडवा आणि पाणी जिरवा’ ही संकल्पना राबवून ग्रामस्थांनी प्रीवॉटर कप स्पर्धेत चुरस निर्माण केली आहे.तहसीलदार शिवाजी जाधव, गटविकास अधिकारी भूषण जोशी, तालुका कृषी अधिकारी पवार, सर्व कृषी सहायक, तलाठी हे स्पर्धेतील गावांना भेटी देऊन लोकांचा सहभाग जास्तीत जास्त मिळण्यासाठी प्रयत्नशील आहेत.