"तटकरेंना दुर्बुद्धी झाली आणि ते भाजपसोबत गेले; लोकसभेचा माझा मार्ग मोकळा"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 09:09 AM2023-08-21T09:09:44+5:302023-08-21T09:10:00+5:30
माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचे जाहीर मत
लोकमत न्यूज नेटवर्क, पाली: सुनील तटकरे हे रायगड लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित होते. मात्र, त्यांना दुर्बुद्धी झाली आणि ते भाजपसोबत गेले. त्यामुळे माझा येथून निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मला निवडणूक लढण्याचे आदेश दिले आहेत, असे जाहीर मत माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी येथे व्यक्त केले.
पाली येथे बल्लाळेश्वराच्या आशीर्वादाने त्यांनी रविवारी मेळावा घेत लोकसभा निवडणुकीचा नारळ फोडला. आगामी सर्व निवडणुकीच्या दृष्टीने जोमाने तयारीला लागा, असे आवाहनही केले. रायगडमध्ये शेकाप-शिवसेना सर्व निवडणुका एकत्रित लढविणार असल्याची भूमिकाही जाहीर केली. गीते यांनी भाजप व शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. भाजप सत्तेसाठी वेडा झाला आहे. त्यांना महाराष्ट्राची, इथल्या जनतेची चिंता नाही. त्यांना खुर्चीची चिंता आहे. जनता यांना चांगला धडा शिकवणार असल्याचे ते सांगितले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, सहसंपर्कप्रमुख किशोर जैन, उपजिल्हा संघटक राजेंद्र राऊत, तालुकाप्रमुख दिनेश चिले यांनीही मनोगत व्यक्त केले.
शिवसेनेत इन कमिंग
सध्या ठाकरे शिवसेनेत जोरदार इन कमिंग सुरू असून मातोश्रीवर रोजच प्रवेश होत आहेत.
आता पेणचे शिशिर धारकर व समीर म्हात्रे हेदेखील मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी प्रवेश करणार असल्याची माहिती अनंत गीते यांनी दिली.