तटकरे विरूद्ध तटकरे पुन्हा सामना रंगणार; अनिल तटकरेंचा शरद पवार गटात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 09:24 AM2024-02-24T09:24:17+5:302024-02-24T09:25:00+5:30
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांचे भाऊ माजी आमदार अनिल तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला.
रोहा : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांचे भाऊ माजी आमदार अनिल तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला. त्यांना राज्य उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे रायगडात तटकरे कुटुंबात राजकीय सामना रंगणार आहे.
अनिल तटकरे यांचे सुपुत्र अवधूत तटकरे हे रोहा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष असून, २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आले होते. काही काळानंतर माजी आमदार अनिल तटकरे व अवधूत तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठी देत शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर अनिल तटकरे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले आहेत. तटकरे कुटुंबातील वाद म्हणजे ठरवून केलेले त्यांच्या सोयीचे राजकारण असल्याचे अनेकदा समोर आले आहे, अशी कुजबुज पुन्हा सुरू झाली आहे.
सर्वांचे जिल्ह्यातील राजकारणाकडे लक्ष
एक भाऊ शरद पवार गटात, तर दुसरा भाऊ अजित पवार गटात सक्रिय असल्याने जिल्ह्यातील राजकारणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अनिल तटकरे हे गेल्या आठ ते दहा वर्षांपासून राजकारणापासून अलिप्त राहिले होते. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क तुटला आहे.
आता शरद पवार गटात सामील झाल्याने आपल्याच लहान भावाला शह देण्यासाठी अनिल तटकरे काय खेळी खेळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत अनिल तटकरे यांची भूमिका निर्णायक ठरेल का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.