Tauktae Cyclone: रायगड समुद्रकिनारी दोन दिवसांत आढळले ८ मृतदेह; ओळख पटवण्याचे काम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 08:36 AM2021-05-24T08:36:53+5:302021-05-24T08:48:35+5:30
अलिबागमध्ये ७ आणि मुरुडमध्ये १ मृतदेह आढळले आहे.
रायगड: तौक्ते वादळाचा तडाखा मुंबई हाय परिसरात तेल विहिरींसाठी काम करणाऱ्या नौका आणि तराफांना बसून झालेल्या दुर्घटनेनंतर बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध सुरू असताना रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर दोन दिवसात आठ मृतदेह आढळले आहेत. या मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
अलिबागमध्ये ७ आणि मुरुडमध्ये १ मृतदेह आढळले आहे. नागरिकांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर रायगड पोलिसांनी हे मृतदेह ताब्यात घेतले. या मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यांचे डीएनएही घेण्यात येणार असून ओळख पटवण्यासाठी मुंबई पोलीस आणि ओएनजीसीच्या अधिकाऱ्यांची मदत घेतली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक दुधे यांनी सांगितले. तसेच गुजरातच्या वलसाडमध्येही ८ मृतदेह आढळले असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.
अलिबाग आणि मुरुडच्या किनाऱ्यावर आढळून आलेले हे मृतदेह तौक्ते चक्रीवादळात मुंबई - हाय जवळ बुडालेल्या बार्जमधील बेपत्ता असलेल्या व्यक्तींचे असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मृतदेहांची ओळख पटल्यानंतर पुढील माहिती जाहीर करण्यात येईल असं तूर्तास रायगड जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
...तर दुर्घटना टळली असती!
हवामान विभागाकडून धोक्याची सूचना मिळाल्यानंतरही तौक्ते चक्रीवादळ जास्त वेळ राहणार नाही, ते आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, या भ्रमात, कॅप्टन राकेश बल्लवने बार्ज पी-३०५ ला सुरक्षितस्थळी हलविले नाही. शिवाय आपत्कालीन परिस्थितीत त्यांनी डिस्ट्रेस सिग्नल दिला नाही, असा आरोप होत आहे.
१७ तास तरंगत केली मृत्यूवर मात !
ताशी ६० ते ७० नॉट्स वेगाने वाहणारे वारे वाहात असताना १५ ते २० जण एकमेकांचे हात पकडून संध्याकाळी ५ ते सकाळी १० असे सुमारे १७ तास समुद्रात तरंगत होतो. मदतीसाठी आरडाओरड करत हाेताे, पण वाऱ्याचा वेग जास्त असल्याने मदतीला कोणी पोहोचले नाही, हा अनुभव अभियंता मुस्ताफिजुर रेहमान शेख यांनी कथन केला.