मधुकर ठाकूर
उरण : फुल विकत घेत असतानाच उरण शहरातील राममंदिराची भिंत अचानक कोसळून नीता नाईक (६०) या महिलेचा दुदैवी मृत्यू झाला आहे.तर नागाव येथील भाजी विक्रेत्या सुनंदाबाई घरत ( ५५) ही आणखी एक महिला गंभीररित्या जखमी झाली आहे.उपचारासाठी जखमी महिलेला वाशी येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.रायगड जिल्ह्यातील तौक्ते चक्रीवादळात उरणची महिला पहिली बळी ठरली आहे.
नीता नाईक या आवेडा-केगाव येथील रहिवासी आहेत.घरीच हारफुले विक्रीचा व्यवसाय करुन त्या आपल्या कुटुंबाला चरितार्थ चालविण्यासाठी हातभार लावत होत्या.दररोज व्यवसायासाठी बाजारातून फुले आणण्यासाठी जात होत्या.सोमवारी सकाळी ९.१५ सुमारास नुतनीकरणाचे बांधकाम सुरू असलेल्या उरण शहरातील राममंदिराच्या खाली फुले विकत घेण्यासाठी चालल्या होत्या.मात्र मंदिराच्या पहिल्या मजल्यावरील सिमेंटब्लाक आणि विटांची भिंत अचानक कोसळून नीता नाईक यांचा दुदैवी मृत्यू झाला.तर राममंदिरा खालीच टोपली मांडून भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या सुनंदाबाई घरत या महिलाही गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती उरण पोलिसांनी दिली.
दरम्यान उरण परिसरात किनारपट्टीवरील गावातील अनेक घरांची पत्रे उडाली आहे.पडझड झाली आहे.काही ठिकाणी झाडे कोसळून घरांचे नुकसान झाले आहे.विद्युत तारा ,पोल कोसळले आहेत.यामुळे उरण परिसरातील अनेक गावांची बत्तीस गुल झाली असुन रविवारी रात्री पासुन अंधारात बुडाली आहेत.