शासकीय कार्यालयाचे कामकाज ठप्प नागरिकांची गैरसोय
By वैभव गायकर | Published: March 17, 2023 07:27 PM2023-03-17T19:27:59+5:302023-03-17T19:28:19+5:30
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह अनेक मागण्यांसाठी पनवेलसह रायगड जिल्ह्यामध्ये सरकारी कर्मचार्यांसह शिक्षकांनी संप पुकारला आहे.
पनवेल: जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह अनेक मागण्यांसाठी पनवेलसहरायगड जिल्ह्यामध्ये सरकारी कर्मचार्यांसह शिक्षकांनी संप पुकारला आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.पंचायत समिती,प्रांत कार्यालय,तहसील कार्यालयाचे कामकाज पूर्ण ठप्प झाले आहे.
पनवेल महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी या संघातुन माघार घेतल्याने पालिकेचे कामकाज सुरळीत सुरु आहे.कृषी, महसूल, शैक्षणिक अशा वेगवेगळ्या कामांसाठी अलिबागमधील विविध सरकारी कार्यालयात हजारोंच्या संख्येने नागरिक येत असतात; पण विविध मागण्यांसाठी कर्मचारी, शिक्षकांनी मंगळवारी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे सर्व कामकाज ठप्प झाल्याचे दिसून आले. त्यामुळे या आंदोलनाचा फटका तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांसह विद्यार्थ्यांनाही बसला आहे.
सरकारी कर्मचार्यांच्या प्रमुख मागण्या पेन्शन योजना लागू करावी, कंत्राटी कर्मचार्यांना नियमित करावे, रिक्त पदे अग्रक्रमाने भरा, चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांची पदे निरसित करू नका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्या, अशा अनेक मागण्या प्रलंबित राहिल्यामुळे कर्मचारी व शिक्षकांमध्ये नाराजी आहे. या मागण्यांसाठी ठिकठिकाणी रॅली काढण्यात आली होती.
यावेळी आंदोलकांनी निदर्शनासह घोषणाबाजी केली.महसूल, वन, आरोग्य, शिक्षण, कृषी इत्यादी सर्व विभागांतील राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायत, विविध प्राधिकरण, निमसरकारी कर्मचारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, सर्व उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथील परिचारिका व कर्मचारी, सर्व माध्यमिक व प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व चतुर्थ श्रेणी (गट ड) कर्मचारी, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगर पंचायतमधील सर्व कर्मचारी, सफाई कामगार, सर्व शासकीय कार्यालयातील अंशकालीन, रोजंदारी व कंत्राटी कर्मचारी, महिला परिचर विभागातील वाहनचालक अशा 62 विभागांत 15 हजारांपेक्षा अधिक कर्मचारी जिल्ह्यातून या संपत सहभागी आहेत.14 मार्च पासुन पुकारलेल्या संप दिवसेंदिवस चिघळत चालला असुन नागरिकांची कामे यामुळे रखडली आहेत.