- कांता हाबळेनेरळ : कर्जत तालुक्यातील वारे येथील जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेत आॅक्टोबर २0१६ पासून शिक्षकांची कमतरता असल्याने येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहेत. दोन वर्षांपूर्वी वारे शाळेतील शिक्षकांच्या बदल्या झाल्याने त्यांच्या जागेवर अद्याप शिक्षकांची नेमणूक केली नसल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महत्त्वाच्या विषयाचे शिक्षक नसल्याने विद्यार्थी या विषयांमध्ये मागे पडले आहेत.वारे शाळेचे मुख्याध्यापक आणि शालेय व्यवस्थापन समितीने अनेकवेळा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे मागणी करूनही अद्याप शिक्षकांची नेमणूक करण्यात आली नाही. वारे येथील शाळेत पहिली ते आठवीपर्यंत येथे सुमारे ८० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.सध्या या शाळेत १ मुख्याध्यापक व २ शिक्षक आहेत. मुख्याध्यापक यांना अध्यापनाव्यतिरिक्त इतरही कामे असल्याने त्यांना दररोज शिकवण्यास वेळ मिळत नाही. याशिवाय येथील विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान व इंग्रजी या महत्त्वाच्या विषयाचे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचा या विषयांचा अभ्यासक्रम पूर्ण होत नाही. या विषयात विद्यार्थी मागे पडत आहेत. त्यामुळे येथील पालक आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत पाठवत असल्याने या शाळेच्या विद्यार्थीसंख्येवर ही त्याचा परिणाम झाला आहे.शासनाचे या जिल्हा परिषद शाळांकडे दुर्लक्ष होत असल्यानेच जिल्हा परिषदेच्या पटसंख्येवर त्याचा परिणाम होत आहे. वारे ग्रामपंचायत हद्दीतील अनेक आदिवासी वाड्यांमधील विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. मात्र शिक्षकांअभावी या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे आणि येथील पालक आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत पाठवत आहेत. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर वारे शाळेवर शिक्षकांची नेमणूक करावी अशी मागणी होत आहे.आॅक्टोबर २0१६ पासून वारे शाळेत इंग्रजी, विज्ञान, गणित विषयांच्या शिक्षकांची कमतरता असून इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत दोन शिक्षक मंजूर असून सद्यस्थितीत एकच शिक्षक शिकवत आहेत. तसेच सहावी ते आठवीपर्यंत तीन शिक्षक मंजूर असून सद्यस्थितीत दोनच शिक्षक कार्यरत आहेत. या संदर्भात वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केला असून लवकरच दोन शिक्षकांची नेमणूक होईल अशी अपेक्षा आहे.- दिलीप गोसावी, मुख्याध्यापक, केंद्र शाळा वारे
वारे केंद्र शाळेत शिक्षकांची पदे रिक्त; गणित, विज्ञान व इंग्रजी विषयात विद्यार्थी मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 4:19 AM