उरण : जेएनपीटी वसाहतीमधील आर.के. फाउंडेशनच्या शाळेतील सहा शिक्षकांवर वेतनाच्या नावाखाली देण्यात येणारी अनामत रक्कम स्वीकारण्यास नकार दिल्याचा ठपका ठेऊन तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे. संस्थेच्या मनमानी कारभारामुळे संतप्त झालेल्या शिक्षकांनी जेएनपीटी शिक्षक संघटनेच्या नेतृत्वाखाली घेराव घालून निदर्शने केली.जेएनपीटी वसाहतीमध्ये मराठी, इंग्रजी माध्यमाची दहावीपर्यंत शाळा आहे. जेएनपीटीच्या मालकीच्या या शाळेत २७०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जेएनपीटीने याआधी ३० जून २०१९ पर्यंत शाळा सलग २० वर्षं इंडियन एज्युकेशन सोसायटी मुंबई यांना करारावर चालविण्यास दिली होती. त्यानंतर करार संपुष्टात आल्यानंतर काढण्यात आलेल्या निविदानंतर ही शाळा १ जुलै २०१९ पासून मालाड-मुंबई येथील रुस्तमजी केरावाला फाऊंडेशनला चालविण्यासाठी देण्यात आली आहे. तेव्हापासून या संस्थेमार्फत शाळा चालवली जात आहे. या शाळेत ११४ शिक्षक मागील ३० वर्षांपासून काम करीत आहेत. संस्थेने नियमांची पायमल्ली करून शाळेचा ताबा घेऊन कामकाज सुरू केले आहे. मात्र संस्था नियमानुसार काम करीत नसल्याच्या ३० वर्षांपासून काम करीत असलेल्या शिक्षकांच्या तक्रारी आहेत.दोन वर्षांपासून शिक्षकांना देण्यात येणाऱ्या वेतनात कपात केली आहे. वेतनही देताना अनामत रक्कम म्हणूनच दिले जात आहे. दोन वर्षांपासून शिक्षकांच्या खात्यात ग्रॅज्युईटी, पीएफची रक्कम जमा करण्यात आलेली नाही. सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या रकमा अदा करण्यात टाळाटाळ केली जात आहे. अशा विविध प्रकारच्या तक्रारी शिक्षकांकडून केल्या जात आहेत. दोन दिवसांपूर्वी वेतनाच्या नावाखाली अनामत म्हणूनच दिली जाणारी रक्कम स्वीकारण्यास नकार देणाऱ्या सहा शिक्षकांवर संस्थेने तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे. ‘सहा शिक्षकांवरील निलंबनाची कारवाई मागे घ्या’ संस्थेने चालविलेल्या मनमानी आणि नियमबाह्य कारभारामुळे शिक्षकवर्ग संतप्त झाला आहे. सहा शिक्षकांवर निलंबनाची केलेली कारवाई मागे घेण्याची मागणी शिक्षकांची आहे. यासाठीच शिक्षकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असल्याची माहिती शाळेच्या शिक्षिका सुषमा कोल्हे यांनी दिली. निलंबित शिक्षकांच्या वतीने पोलिसात तक्रार दाखल करण्याची तसेच याबाबत न्यायालयात दाद मागण्याची घोषणाही जेएनपीटी शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आली.
जेएनपीटी वसाहतीत शिक्षकांची निदर्शने, आर.के. फाउंडेशनच्या अधिकाऱ्यांना घेराव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2021 12:53 AM