पावसाने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू; मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 11:59 PM2020-10-15T23:59:23+5:302020-10-15T23:59:52+5:30

भाताचे नुकसान : विजांच्या कडकडाटासह पाऊस

Tears in the eyes of farmers brought by the rains; Large financial losses | पावसाने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू; मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान 

पावसाने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू; मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान 

Next

दासगाव : यंदा परतीच्या पावसाने गेल्या तीन दिवसांपासून संपूर्ण कोकणाला विजेच्या कडकडाटासह झोडपून काढले आहे. या पावसामुळे भातशेतीचे मोठ्या  प्रमाणात नुकसान झाले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, चार दिवस कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्याप्रमाणे गेल्या दोन दिवसांपासून कोकणात विजेच्या कडकडाटासह परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. महाड तालुक्यातदेखील पावसाचा मोठ्या प्रमाणात जोर असून, गेले तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. जनजीवन विस्कळीत झाले असून या पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका शेतकऱ्यांना बसला आहे. 

दासगाव येथील रमेश भिकू राणे या एकाच शेतकऱ्याची जवळपास तीन एकर जमिनीमधील भातशेती जमीनदोस्त झाली असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अशा प्रकारे महाड तालुक्यात अनेक शेतकरी आहेत की ज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांचे पोटच यावर अवलंबून आहे, त्या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने लवकरच नुकसानीचे पंचनामे करून मदत जाहीर करण्याची गरज निर्माण झाली आहे.

माझ्या तीन एकर शेतीमध्ये भातलागवड केलेली आहे. दरवर्षी या शेतीमधून दहा खंडी भातपीक निघते. माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह याच भातपिकावर अवलंबून आहे. परतीच्या पावसामुळे संपूर्ण शेती जमीनदोस्त झाली आहे. माझे जवळपास दोन लाखांचे नुकसान झाले आहे. माझ्या कुटुंबावर उपासमारीची पाळी येऊ नये यासाठी शासनाकडून पंचनामे करून मदत मिळावी, अशी अपेक्षा आहे. - रमेश भिकू राणे, शेतकरी दासगाव.

रायगडमधील शेतकरी चिंतातुर

पश्चिम बंगालच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सुरू झालेल्या अतिवृष्टीने रायगडातील शेतीला फटका बसला आहे. पावसाने बहरलेली उभी भातपिके कोलमडून पडली असून, हाताशी आलेले पीक पडल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. दरम्यान, हवामान खात्याने १७ ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने शेतकरी अधिक चिंताग्रस्त झाला आहे. या वर्षी जिल्ह्यात १ लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी भातशेती लावली आहे. जिल्ह्यात पडलेल्या पावसाने भातशेती चांगलीच बहरली होती. त्यामुळे शेतकऱ्याला चांगले पीक येऊन हाताशी पैसेही मिळणार होते. मात्र अवेळी पडत असलेल्या पावसाने भातशेतीचे अतोनात नुकसान होत आहे. त्यातच वादळामुळे सुरू झालेल्या अतिवृष्टीने भातशेतीचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात भातशेती चांगलीच बहरली असताना काही भागात कापणीही सुरू झाली आहे. त्यामुळे कापलेल्या भाताचे भारे शेतकऱ्यांनी बांधून ठेवले आहेत. तर काही शेतकरी दसऱ्यानंतर भातकापणीला सुरुवात करतात. मात्र, पावसाने कापलेली भातपिके भिजली असून उभे असलेले पीकही पडले आहे. त्यामुळे भातपिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच १७ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
 

Web Title: Tears in the eyes of farmers brought by the rains; Large financial losses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.