उत्तरकार्यावेळी तळीयेमध्ये फुटला नातलगांच्या अश्रूंचा बांध, जागविल्या आप्तांच्या आठवणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 08:46 AM2021-08-04T08:46:02+5:302021-08-04T08:47:15+5:30
महाड तालुक्यातील तळीये दरड दुर्घटनेला मंगळवारी १३ दिवस पूर्ण झाले. मृत झालेल्यांचे उत्तरकार्य मंगळवारी गावात करण्यात आले. मृतांच्या नातेवाइकांच्या डोळ्यांतून आजही अश्रूंचा बांध फुटला होता.
रायगड : महाड तालुक्यातील तळीये दरड दुर्घटनेला मंगळवारी १३ दिवस पूर्ण झाले. मृत झालेल्यांचे उत्तरकार्य मंगळवारी गावात करण्यात आले. मृतांच्या नातेवाइकांच्या डोळ्यांतून आजही अश्रूंचा बांध फुटला होता. अशा शोकाकुल वातावरणात तळीये गावात मृतांचे उत्तरकार्य पार पडले.
२२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीत तळीये गावात पूर्ण डोंगर वाडीवर कोसळला आणि क्षणार्धात वाडीला गिळून टाकले होते. सरकार आणि प्रशासनाने बचावकार्य हाती घेतले. मात्र, एकही जिवंत व्यक्ती सापडली नाही. ५४ मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आले. उर्वरित ३१ नागरिकांना मृत घोषित करण्याचा प्रस्ताव सरकार दरबारी पाठविण्यात आला आहे. काही मृतांच्या नातेवाइकांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. तळीये दुर्घटनेला मंगळवारी १३ दिवस पूर्ण झाले. मृतांच्या आत्माला शांती लाभावी यासाठी रीतीरिवाजाप्रमाणे ८४ मृतांचे तेराव्याचे उत्तरकार्य गावात करण्यात आले. यावेळी मृतांच्या नातेवाइकांना दुःख अनावर होत होते. तसबिरीचे दर्शन घेताना आपला माणूस गेल्याच्या दु:खात त्यांनी हंबरडा फोडला. तळीये गावावर शोककळा पसरली होती.
उत्तर कार्यासाठी प्रशासनाने सहकार्य केले. ग्रामस्थांनीही मोलाचे सहकार्य केले, अशी माहिती स्थानिक आमदार भरत गोगावले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. घडलेली दुर्घटना अत्यंत वाईट असून, मृतांच्या आत्म्याला शांती लाभो, अशी श्रद्धांजली त्यांनी वाहिली. या प्रसंगी जिल्हाधिकारी निधी चौधरी, ठाण्याचे उपमहापौर नरेश म्हस्के, अशोक पांडे, पंचायत समिती सभापती स्वप्ना मालुसरे, जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड उपस्थित होते.
ग्रामस्थ झाले भावनावश
तळीये दुर्घटनेला मंगळवारी १३ दिवस पूर्ण झाले. मृतांच्या आत्माला शांती लाभावी यासाठी रीतीरिवाजाप्रमाणे ८४ मृतांचे तेराव्याचे उत्तरकार्य गावात करण्यात आले. यावेळी मृतांच्या नातेवाइकांना दुःख अनावर होत होते. तसबिरीचे दर्शन घेताना आपला माणूस गेल्याच्या दु:खात त्यांनी हंबरडा फोडला. तळीये गावावर शोककळा पसरली होती.