दासगाव : महाड तालुक्यातील सावित्री खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन केले जाते. परवाना असतानादेखील कमी परवाना घेऊन जास्त प्रमाणात वाळूची वाहतूक करणाऱ्यांना लगाम लावण्यासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश काढला. त्याच आदेशाचे पालन करत महाडचे तहसीलदार यांनी तालुक्याच्या टोलनाका या ठिकाणी तीन शिफ्टमध्ये तालुक्यातील सर्व तलाठ्यांना तपासणीसाठी तैनात केले. यामुळे वाळू नेणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू झाली व विनापरवाना होणाऱ्या वाहतुकीला मोठ्या प्रमाणात लगाम लागले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाने वाळूचोरांचे धाबे दणाणले आहेत.महाड तालुक्यातील सावित्री खाडीही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काळ्या सोन्याची खाण म्हणून प्रसिद्ध आहे. या खाडीमध्ये बांधकामासाठी उत्तम दर्जाची काळी वाळू निघत असल्याने मुंबईसह महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातून या वाळूला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. दर वर्षी या वाळूउपशासाठी निविदा निघतात. काही वर्षांपूर्वी ट्रेझरद्वारे या खाडीमधून मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जात असे. यंदा डिसेंबर २०१६ ते सप्टेंबर २०१७ या कालावधीसाठी महाड तालुक्यातील या सावित्री खाडीमधून सहा व्यावसायिकांना हातपाटी वाळूउपशासाठी परवाने देण्यात आले आहेत. परवाना कमी काढून उपसा मोठ्या प्रमाणावर करणे व त्याची वाहतूकदेखील मोठ्या प्रमाणात विनापरवाना करून शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलाला चुना लावण्याचा गोरखधंदा या ठिकाणी सुरू होता. जिल्हाधिकारी शीतल उगले-तेली यांनी संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आदेश काढून मुख्य ठिकाणी अशा प्रकारे होणाऱ्या वाळू वाहतुकीच्या तपासणीसाठी नाके बसवण्याचे आदेश तहसील कार्यालयांना दिले. त्याप्रमाणे महाड तालुक्यासह जिल्ह्यांच्या १५ ठिकाणी नाके बसवले आहेत. या ठिकाणी तीन शिफ्टमध्ये तालुक्यातील सर्वच तलाठ्यांच्या पाळी लावल्या, हा नाका ७ फे ब्रुवारीपासून सुरू झाला असल्याचे तहसीलदारांनी सांगितले. खाडीतून भरलेली, येणारी वाळूची गाडी या नाक्यावर थांबवून त्याच्या परवान्याची तपासणी करून सोडण्यात येणार असून, जास्त वाळू आणि कमी परवाना असणाऱ्या वाहनांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.सध्याच्या या तपासणी नाक्यामध्ये महिला तलाठ्यांच्याही ड्युट्या लावण्यात आल्या असून, त्यांना दिवसाच्या पाळीमध्ये समाविष्ट करून घेण्यात आलेला आहे. याअगोदर याच ठिकाणाहून शेकडो गाड्या ट्रक वाळूची वाहतूक करत होत्या. मात्र, नाका बसल्यापासून दिवसात दोन किंवा तीनच ट्रक वाळू या ठिकाणाहून बाहेर पडत आहे. या तपासणी नाक्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आलेला आहे.
वाळू वाहतुकीवर तहसीलदारांचा लगाम
By admin | Published: February 13, 2017 5:11 AM