प्रदीप मोकलवडखळ- मुंबईकडे जाणा-या तेजस एक्प्रेसने धडक दिल्याने रेल्वेच्या तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पेण तालुक्यातील जिते गावाजवळ रविवारी रात्री उशिरा घडली. पनवेल ते पेण रेल्वे मार्गावर सध्या काम सुरू आहे. जिते येथेही काम सुरू असून, त्यासाठी रेल्वेचे काही कंत्राटी कामगार रेल्वे रुळाजवळ काम करण्यासाठी आले आहेत. त्यापैकी काही कामगार रविवारी राञी 9 वाजण्याच्या सुमारास जिते गावात खरेदीसाठी गेले होते. खरेदी करून ते परत येत असताना रेल्वे रुळ ओलांडताना भरधाव वेगाने जाणा-या तेजस एक्स्प्रेसने अशोक बारे (३०), भीमसेन गुलकर(४५) व अजय दांडोडिया (२०, सध्या रा. जिते रेल्वे स्टेशन, मूळ रा. मध्य प्रदेश) यांना जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, तिघांचाही गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेचे वृत्त समजताच दादर सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गायकवाड हे आपल्या सहका-यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि तिन्ही मृतदेह पेण येथील शासकीय रुग्णालयात आणले. या प्रकरणी आकस्मिक मृत्यू म्हणून दादर सागरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास हेड. कॉ. सोनकर हे करीत आहेत. दरम्यान या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिले आहेत.
तेजस एक्स्प्रेसच्या धडकेने रेल्वेच्या तीन कामगारांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 3:30 PM