चिरनेर : धुतूम गावाजवळील इंडियन आॅईल कंपनीमधून परत एकदा पेट्रोलची गळती झाल्यामुळे कंपनी आणि परिसराच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कंपनीतून यापूर्वी अनेक वेळा आॅईल गळती आणि नाफ्ता चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यातच वारंवार होणाऱ्या तेलगळतीमुळे धुतूमगावाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. इंडियन आॅईल कंपनीच्या धुतूम येथे तेल साठवणुकीच्या मोठ्या टाक्या आहेत. जेएनपीटी बंदरातून आयात होणारे तेल येथील टँक फार्ममध्ये साठविले जाते, नंतर ते टँकर किंवा रेल्वे वॅगनमार्फत इतरत्र पाठविले जाते. कंपनीने रेल्वे वॅगन भरण्यासाठी कंपनीतून रेल्वे स्टेशनपर्यंत पाइपलाइन आहेत. या पाइपलाइनमधूनच वारंवार ही तेलगळती होत आहे. रविवारी देखील या पाइपलाइनमधूनच तेलगळती झाली होती. काही जागरूक शेतकऱ्याच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी याची माहिती रायगड जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर यांना दिली. त्यांनी याबाबतची तक्रार कंपनीकडे केली. मात्र याकडे कंपनी दुर्लक्ष करीत आहे. (वार्ताहर) कंपनीतून कोणत्याही प्रकारची तेलगळती झाली नसल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र तरीही वस्तुस्थिती पाहण्यासाठी जासईच्या तलाठ्यांना घटनास्थळावर पाठवून अधिक माहिती घेतली जाईल. - नितीन चव्हाण, तहसीलदार, उरण
आयओटीएल कंपनीतून तेलगळती
By admin | Published: June 29, 2015 4:12 AM