कर्जत : रायगड जिल्ह्यात टेलिमेडिसीन कीट ही संकल्पना यशस्वीपणे राबविण्यासाठी त्याची सुरुवात कर्जतमधील प्राथमिक आरोग्य केंद्र कडावमधून करण्यात आली. टेलिमेडिसीन कीट या प्रकारच्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात येणाऱ्या तपासणीत रुग्णाला त्याच आरोग्य केंद्रात तपासणी करून त्यावर इंटरनेटच्या साह्याने त्यांच्याशी जोडलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन तिथेच उपचार केले जाणार आहेत.
हे आरोग्य तपासणीचे प्रात्यक्षिक कर्जतमधून घेतले असून संपूर्ण रायगड जिल्ह्यात टेलिमेडिसीन कीट प्रात्यक्षिक घेऊन मग ही संकल्पना राबवली जाणार आहे. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून आणि सहकार्याने ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर असलेली सुविधा उपलब्ध व्हावी, म्हणून रायगड जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या पुढाकाराने कर्जत तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कडाव, मोहाली, नेरळ, कळंब, खांडस, आंबिवली या केंद्रात टेलिमेडिसीन कीटसंदर्भात तज्ज्ञांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिक सादर केले गेले. माजी आमदार देवेंद्र साटम आणि यांच्या सहकाºयांनी तालुक्यातील आरोग्य केंद्रात याची माहिती दिली.आरोग्यविषयक गंभीर समस्या सर्वांपुढे आ वासून उभी आहे. त्यावर कशाप्रकारे मात करायची हे मोठे आव्हान सर्वांसमोर होते; परंतु टेलिमेडिसीन कीट या संकल्पनेतून प्रत्यक्षात उतरणारी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात येणारी आरोग्य तपासणी पुढील काळात सर्वांना वरदान ठरणार.- देवेंद्र साटम, माजी आमदार