मंदिराच्या घंटा वाजल्या, मात्र अबालवृद्धांना घरातूनच दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 12:53 AM2020-11-21T00:53:51+5:302020-11-21T00:53:54+5:30
काेराेनाचा प्रादुर्भाव कमी न झाल्याने जिल्हा प्रशासनाचा सल्ला
निखिल म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गामुळे मागील आठ महिन्यांपासून बंद असलेल्या मंदिरांचे दरवाजे भक्तांसाठी खुले करण्यात आले आहेत. मात्र अद्यापही काेराेनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. त्यामुळे वयाेवृद्ध नागरिक आणि लहान मुलांनी घरातूनच देवदर्शन घ्यावे, असे अलिखित आवाहन रायगडच्या जिल्हा प्रशासनाने केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नागरिकांनी मंदिर, प्रार्थनास्थळांमध्ये गर्दी करू नये, असेही सांगण्यात आले आहे.
कोरोनामुळे महाराष्ट्र शासनाने मंदिरांमध्ये घातलेली प्रवेशबंदी अलीकडेच उठविल्यामुळे रायगड जिल्ह्यातील मंदिरांशी संबंधित असेलेले व्यावसायिक खूश झाले आहेत. धार्मिक पर्यटनामुळे जिल्ह्यात होणारी उलाढाल आता पूर्ववत होणार असल्याने मंदिर परिसरात लगबग दिसू लागली आहे.
जिल्ह्यात अनेक प्राचीन तीर्थक्षेत्रे आणि धार्मिक स्थाने आहेत. अष्टविनायकांपैकी दोन गणेश सुधागड आणि खालापूर तालुक्यांमध्ये आहेत. पाली येथील बल्लाळेश्वर आणि महड येथील वरदविनायक ही क्षेत्रे
प्रसिद्ध आहेत. गेले सात ते आठ महिने मंदिरे बंद असल्यामुळे या मंदिरांवर
उभे असणारे अर्थकारण ठप्प झाले
होते.
यांना मिळणार प्रवेश
दर्शनासाठी आलेल्या भक्तांनी मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. सॅनिटायजरही वापरणे गरजेचे आहे. मंदिरात दर्शनासाठी येताना घोळक्याने येऊ नये. भक्तांनी दर्शनासाठी रांगेत उभे राहताना अंतर ठेवून उभे राहावे. आजाराची लक्षणे नसलेल्यांनाच प्रवेश.
यांना प्रवेश नाही
६५ वर्षांवरील भक्त, विविध आजारांनी ग्रस्त असलेले आणि १० वर्षांखालील मुलांना दर्शनासाठी गर्दीत आणू नये. सतत आजाराने ग्रस्त तसेच कोरोनाची लक्षणे असलेल्या नागरिकांना प्रवेश नाकारण्यात आला असून, त्यांनी घरातून दर्शन घ्यावे.
मंदिर प्रवेशाबाबत नियमावली
धार्मिक स्थळी संबंधित व्यवस्थापनाने निर्धारित केलेल्या वेळेत भाविकांना प्रवेश.
प्रार्थना स्थळांमध्ये येणारे भाविक आणि पर्यटकांनी मुखपट्टी वापरणे बंधनकारक.
अंतर नियमाचे पालन आवश्यक, थर्मल स्कॅनिंग, जंतुनाशके ठेवणे आवश्यक. आजाराची कोणतेही लक्षणे नसलेल्यांनाच प्रवेश.
थुंकण्यास सक्त मनाई, मंदिरात प्रवेश करताना हात-पाय स्वच्छ धुणे किंवा जंतुरोधकाने हातांचे निर्जंतुकीकरण बंधनकारक.
धार्मिक स्थळी कोरोनाबाबत जनजागृती करणारी व्यवस्था व्यवस्थापनाने उभारावी.
प्रवेशासाठी आणि बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र दरवाजे
प्रसादवाटपास मनाई.
नियमांचे उल्लंघन केल्यास होणार दंड
राज्यभरातून लोक या ठिकाणी येतात. पूजापाठातून पुरोहितांना उत्पन्न मिळते. तेही ठप्प झाल्याने मंदिरांचे पुजारीही हवालदिल झाले होते. संत तुकारामांच्या भेटीने परमार्थमय झालेला खालापूर तालुक्यातील साजगाव येथील विठ्ठल मंदिर परिसरही घंटानादाने भरून गेला आहे. तर दुसरीकडे मंदिर व्यवस्थापनाकडून विषेश खबरदारी घेतली जात आहे.