जिल्ह्यातील मंदिरांत ओम नम: शिवायचा गजर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 11:24 PM2019-03-04T23:24:31+5:302019-03-04T23:24:48+5:30

जिल्ह्यात महाशिवरात्रीचा उत्सव सोमवारी उत्साहात आणि भक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

In the temples of the district, Om Namah: Exercise alarm | जिल्ह्यातील मंदिरांत ओम नम: शिवायचा गजर

जिल्ह्यातील मंदिरांत ओम नम: शिवायचा गजर

Next

अलिबाग : जिल्ह्यात महाशिवरात्रीचा उत्सव सोमवारी उत्साहात आणि भक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त जिल्ह्यातील शिवमंदिरांमध्ये महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. हर, हर महादेव, बम बम भोले..., ओम नम: शिवायच्या गजरात दिवसभर मंदिरांमध्ये धार्मिक विधी सुरू होते. याशिवाय भजन, कीर्तन व सांस्कृतिक कार्यक्र माचेही आयोजन करण्यात आले होते. अलिबाग येथील डोंगरावर असलेल्या श्रीक्षेत्र कनकेश्वर येथे पहाटे ४ वाजल्यापासून भाविक दर्शनासाठी पोहोचले होते. शहरातील काशी विश्वेश्वर, वेश्वीतील गोकुळेश्वर, खंडाळा डोंगरावरील रामधर्णेश्वर, चौल येथील कुंडेश्वर, सराई येथील रामेश्वर, रामराज विभागातील ताजपूर येथील पिंपळेश्वर, गोरेगाव येथील त्र्यंबकेश्वर, पेणचे पाटणेश्वर, महलमिरा डोंगरावरील व्याघ्रेश्वर, महाड येथील श्री वीरेश्वर मंदिरात महादेवाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा दिसून आल्या.
काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्र माच्या माध्यमातून महाशिवरात्र उत्सव साजरा केला. काही संस्थांनी सामाजिक उप्रकमही राबवले. यात रक्तदान, आरोग्य शिबिरांचा समावेश होता. रायगड जिल्ह्यात महाशिवरात्र उत्सवानिमित्ताने ठिकठिकाणी पालखी मिरवणुका काढण्यात आल्या. या वेळी रायगड जिल्ह्यात पोलीस ठाण्यामार्फत ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
>कर्जतमध्ये कपालेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी
कर्जत : तालुक्यातील प्रत्येक शिवमंदिराच्या बाहेर दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा दिसत होत्या. शहरातील श्री कपालेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. २८ फेब्रुवारी ते २ मार्चपर्यंत मंदिरात कीर्तन ठेवण्यात आले होते. सोमवारी सकाळी महापूजेनंतर लघुरु द्र, अभिषेक, सामूहिक शिवलीलामृत वाचन झाले. दुपारी भजन ठेवण्यात आले होते. सायंकाळी श्री कपालेश्वराची पालखी मिरवणूक काढण्यात आली.
पांडवकालीन वैजनाथ येथील मंदिरात शिवभक्तांसाठी यात्रा भरली होती. दिवसभर कर्जत तालुक्यातील भाविकांची दर्शनासाठी वर्दळ होती. कोल्हारे येथे त्रिवेणी संगमावर असलेल्या पांडवकालीन शिवमंदिरामध्ये शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी झाली होती. माथेरान येथील पिसरनाथ महाराज तसेच धापया आणि कपालेश्वर मंदिरात धार्मिक कार्यक्र मांची रेलचेल सुरू होती.
>शिवमंदिरात गर्दी
आगरदांडा : मुरु ड तालुक्यातील गुरव पाखाडी येथील प्राचीन शिव मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती.
शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या असे विधान आहे. त्यांना यामपूजा असे म्हटले जाते. यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालून अनुलेपन केले जाते शिवतत्त्व आकृष्ट करणारा बेल, पांढरी फुले व रु द्राक्षांच्या माळा शिवपिंडीवर वाहली जाते आणि धोत्रा पत्री पूजेत वाहली जातात. तांदळाच्या पिठाचे दिवे करून शिवाला ओवाळले जाते.
>महाडमध्ये छबिनोत्सवाला सुरुवात
महाड : महाडकरांचे आराध्य दैवत असलेल्या श्री विरेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी दिवसभर भक्तांची मोठी गर्दी होती. पहाटेपासून दर्शनासाठी सुरू झालेल्या भक्तांच्या रांगा सायंकाळी उशिरापर्यंत पहायला मिळाल्या. रविवारपासून विरेश्वर महाराजांच्या छबिनोत्सवाला सुरु वात झाली. यानिमित्ताने विरेश्वर मंदिरात विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. छबिनोत्सवानिमित्त विरेश्वर महाराजांची बहीण ग्रामदेवता जाखमाता देवी वाजतगाजत लाडक्या भावाला म्हणजे विरेश्वराच्या भेटीला निघाली. या पालखी मिरवणुकीत शहरातील विविध मंडळांंचे लेझीम पथके देखाव्यासह सहभागी झाले होते. यावेळी सासण काठ्या देखील नाचवण्यात येत होत्या.
>घारापुरी बेटावर हजारो देशीविदेशी भाविकांची गर्दी
उरण : घारापुरी बेटावर महाशिवरात्रीनिमित्त हजारो शिवभक्तांनी गर्दी केली होती. यामध्ये देशी-विदेशी पर्यटकांची संख्याही मोठी होती. बेटावर जाण्या-येण्यासाठी गेटवे आॅफ इंडिया, जेएनपीटी, उरण-मोरा,न्हावा बंदरातून होड्या, लाँचेस, मचव्यांची सोय करण्यात आली होती. पोलीस बंदोबस्तात भाविकांनी महेश मूर्ती आणि शवलिंगाचे दर्शन घेतले.
>खोपोलीतील पेशवेकालीन विरेश्वर मंदिरात अलोट गर्दी
खोपोली : शहरात वरची खोपोली येथील पेशवेकालीन विरेश्वर मंदिरात पहाटेपासून शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती. याठिकाणी मुंबई, ठाणे, पालघरसह रायगड जिल्ह्यातील भाविक येतात. सायंकाळी गगनगिरी आश्रम, वरची खोपोली ते बाजारपेठ अशी पालखी ढोल ताशांच्या गजरात काढण्यात येते. दुसऱ्या दिवशी काकड आरती होवून सकाळी अन्नदान केले जाते.

Web Title: In the temples of the district, Om Namah: Exercise alarm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.