गुरे घेऊन जाणारा टेम्पो गोरक्षकांनी कर्जतमध्ये पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 05:55 AM2019-05-28T05:55:33+5:302019-05-28T05:55:35+5:30
गुरे घेऊन जाणारा टेम्पो गोरक्षक व पोलीस यांच्या मदतीने रविवारी पकडला.
कर्जत : गुरे घेऊन जाणारा टेम्पो गोरक्षक व पोलीस यांच्या मदतीने रविवारी पकडला. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.जनावरांना कर्जत येथील गो शाळेत ठेवण्यात आले आहे.
कर्जत तालुक्यातील ममदापुर येथे कत्तलखाना असल्याचे बोलले जाते. २६ मे रोजी या कत्तलखान्यात गुरे घेऊन जाण्यात येणार असल्याची माहिती कर्जतच्या गोरक्षक कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी चार फाटा येथील वाहतूक पोलीस शरद फरांदे यांना ही माहिती दिली. साधारण रात्री १०.४० वाजण्याच्या सुमारास पळसदरी - कर्जतमार्गे नेरळ परिसरात जाणारा गुरांनी भरलेला एम.एच.०६ ए जी ४१७९ या क्रमांकाचा टेम्पो कर्जतचार फाटा येथे आला. त्यावेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्याला रंगेहाथ पकडून त्यातील दोन गाई व चार बैल कर्जत पोलिसांच्या हवाली केले.
त्यानंतर मात्र गुन्हा नोंद करण्यात गुरांचा वाहतुक परवाना, गुर विकणाऱ्या शेतक-याचे संमती पत्र, वाहनाची सर्व माहिती तसेच देणाºया - घेणाऱ्यांची सखोल चौकशी करुन पुढील कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलिसांनी नेरळ दामत येथील सुफियान सिराज नजे (३८ )याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे गुरे घेऊन जाण्याबाबत कोणतीही कागदपत्र नसल्याने कर्जत पोलीस ठाण्यात रात्री साडे दहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. टेम्पो आणि गुरे असा १ लाख ९० हजार रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. दरम्यान दाटीवाटीने कोंबून भरलेल्या गुरांना कर्जतच्या गोशाळेत पाठविण्यात आले.