अलिबाग : पोलादपूर तालुक्यातील गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लोहारमाळ गावातील संदीप नरे यांच्या घरावर २५ नोव्हेंबर रोजी टाकलेल्या सशस्त्र दरोड्याप्रकरणी सात आरोपींना न्यायालयाने बुधवारी दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या आरोपींनी पेण येथे सशस्त्र दरोडा घालण्याचा कट रचला. त्याप्रमाणे नरे यांच्या घराची देवा मोहिते याने बेल वाजवली. नरे यांनी दरवाजा उघडल्यावर देवाने त्यांना भलार येथून आलो आहोत, आम्हाला भात भरडायला आणायचे आहे, अशा गप्पा मारून नरे बेसावध असताना त्यांना ढकलून सर्व आरोपी तोेंडास रुमाल बांधून घरामध्ये शिरले व घराचे दार आतमधून बंद करून लाकडी दांडक्याचा धाक, ठोशाबुक्यांनी मारहाण करून, तुमच्याकडे पाच लाख रुपये आहेत ते द्या, नाहीतर सर्वांना ठार मारतो, असे धमकावले.वडील रामचंद्र यांना मारहाण करून, बायको समिधाच्या डोक्यात स्टीलचा रॉड घातला. आदित्य मोहितेने हातातील कोयता नरे यांचा मुलगा साक्षात याच्या मानेवर ठेवून त्यास ठार मारण्याची भीती घातली आणि अंगावरील व कपाटातील १४५ ग्रॅमचे दागिने व १० हजार रुपयांची रोख रक्कम, हॉलच्या खिडकीत ठेवलेले तीन मोबाइल फोन घेऊन साक्षीदार मंगेश पवार यांच्या समक्ष गोवा महामार्गाच्या बाजूला पळून गेले होते.>२५ हजार दंडही\देवा मोहिते, सूरज जाधव, आदित्य मोहिते, प्रणिल पाटेकर, रोशन म्हात्रे, दिलीप मोरे आणि दिवेश देशमुख अशी आरोपींची नावे असून, त्यांना सक्तमजुरीबरोबर प्रत्येकी २५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन वर्षे सश्रम कारावास शिक्षा सुनावली आहे.
लोहारमाळ दरोडा प्रकरणी सात आरोपींना १० वर्षे सक्तमजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2018 12:13 AM