जयंत धुळप
अलिबाग - पेण नगरपरिषदेतील पेण नगर विकास आघाडी मधील भाजपाच्या १० नगरसेवकांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याची माहिती रायगड जि.प.अध्यक्षा अदिती सुनील तटकरे यांनी "लोकमतशी बोलताना दिली आहे.
रायगड लोकसभा मतदार संघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप आघाडीचे उमेदवार म्हणून सुनील तटकरे उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या पार्श्वभुमीवर आज शिवसेना-भाजपा युतीला हा मोठा राजकीय धक्का असल्याचं स्थानिक वर्तुळात चर्चा आहे. रायगड लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस- राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे यांनी उमेदवारी देण्यात आली आहे तसेच शिवसेना-भाजपा युतीकडून केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत तटकरे आणि गीते यांच्यात चुरशीची लढाई झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अवघ्या काही हजार मतांनी अनंत गीते यांनी सुनील तटकरे यांचा पराभव केला होता.
त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे हे अनंत गीते यांनी तगडी लढत देण्यासाठी सज्ज झालेत. त्याच पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवरील हालचालींना वेग आला आहे. रायगड जिल्हा परिषदेत शेकाप-राष्ट्रवादीची सत्ता आहे. सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे या सध्या जिल्हा परिषदेत अध्यक्षा आहेत.