रायगड : जिल्ह्यात १५ जुलैच्या मध्यरात्रीपासून ते २४ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत कडक लॉकडाऊन घेण्यात येणार आहे, अशी माहिती रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी येथे दिली. नागरिकांना याचा त्रास होणार आहे. मात्र, सर्वांच्या भवितव्याचा विचार करून हा निर्णय घेत असल्याने सर्वांनी सरकार आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी सर्वसमावेशक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. जिल्ह्यात सध्याच्या स्थितीमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येने सात हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर सव्वादोनशे कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन घेण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले. या कालावधीत भाजीपाला, किराणा मालाची दुकाने बंद राहणार असून फक्त औषधांची दुकाने सुरू राहणार आहेत.रायगडमध्ये ३४२ नवे रुग्णअलिबाग : रायगड जिल्ह्यात सोमवारी ३४२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या ७,८८६ वर पोहोचली आहे. त्यापैकी ४५९६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सोमवारी दिवसभरात पनवेल महानगरपालिका क्षेत्रात १४६, पनवेल ग्रामीणमध्ये ५९, उरण ३५, अलिबाग २८, कर्जत ७, पेण ३३, महाड २, खालापूर १८, रोहा १३, तळा १ असे एकूण ३४२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर दिवसभरात पनवेल मनपा १८१, पनवेल ग्रामीण ३५, उरण २८, खालापूर १४, पेण २२, अलिबाग ७, माणगाव १, रोहा ५, श्रीवर्धन ३, म्हसळा ४, महाड ५ असे एकूण ३०५ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. तर दिवसभरात सात बाधितांचा मृत्यू झाला.
रायगड जिल्ह्यात दहा दिवसांचा लॉकडाऊन - पालकमंत्री आदिती तटकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 2:17 AM