दहा ग्रामपंचायती बिनविराेध; 848 उमेदवारांची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 12:21 AM2021-01-06T00:21:30+5:302021-01-06T00:21:33+5:30

निकालाआधीच उधळला गुलाल; एक हजार ५८८ जण निवडणूक रिंगणात

Ten Gram Panchayats unopposed; Withdrawal of 848 candidates | दहा ग्रामपंचायती बिनविराेध; 848 उमेदवारांची माघार

दहा ग्रामपंचायती बिनविराेध; 848 उमेदवारांची माघार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
रायगड : जिल्ह्यातील ८८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ८४० जागांसाठी एक हजार ५८८ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. साेमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी तब्बल ८४८ उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. विशेष म्हणजे १० ग्रामपंचायती या बिनविराेध झाल्या आहेत. त्यामुळे निवडणुका हाेण्याआधीच या ठिकाणी गुलाल उधळण्यात आल्याने जल्लाेषाचे वातावरण आहे.


ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापायला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. सुरुवातीला उमेदवारी अर्ज दाखल करताना, ८४ जागांसाठी दाेन हजार ४३६ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले हाेते. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या हाेत्या. मात्र, साेमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळी ८४८ उमेदवारांनी माघार घेतली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मदत संपल्यानंतर निवडणूक विभागाचा उमेदवारांना चिन्हवाटप करण्याचा कार्यक्रम होता. मात्र, ऑनलाइन प्रक्रियेमुळे आणि इंटरनेटच्या कासवगती मुळे रात्री उशिरापर्यंत काम सुरू हाेते. ८८ ग्रामपंचायतींपैकी १० ग्रामपंचायती या बिनविराेध झाल्या आहेत. 

ग्रामपंचायतीमध्ये पुरुषांच्या बराेबरीने महिला उमेदवार रिंगणात 
कायद्याने ५० टक्के महिलांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली आहे. त्यामुळे ८८ ग्रामपंचायतीमध्ये पुरुषांच्या बराेबरीने महिला उमेदवारीही निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्या आहेत. राेहा, पनवेल या तालुक्यांमध्ये अनुक्रमे २१ आणि २४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका हाेत आहेत. या ठिकाणी सर्वाधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

राेहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायतीकडे जिल्ह्याचे लक्ष 
राेहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायतीकडे अधिक लक्ष लागण्याचे कारण म्हणजे रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या मतदार संघातील ग्रामपंचायत आहे. त्याचप्रमाणे, अलिबाग तालुक्यातील पेझारी या ग्रामपंचायतींमध्ये शेकापचेच वर्चस्व आहे, तसेच शेकापच्या बालेकिल्ल्यातील ग्रामपंचायत असल्याने सर्वांचेच लक्ष लागले आहे.

पनवेल, राेहा, कर्जत तालुक्यातून सर्वाधिक उमेदवार 
पनवेल, राेहा, कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक उमेदवार रिंगणामध्ये आहेत. पनवेल तालुक्यात २४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत २२८ जागांसाठी ४३२ उमेदवार नशीब आजमावत आहेत. राेह्यात २१ ग्रामपंचायतीच्या १९१ जागांसाठी ३७४ उमेदवार रिंगणात आहेत. कर्जतमधील ९ ग्रामपंचायतीमधील ८९ जागांसाठी १८१ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. माणगावमधील देवळी, लाखपाले, टेमपाले, महाड- भेलाेशी, आसनपाेई, पनवेल-आकुर्ली, खानावले, कर्जत-हुमगाव, श्रीवर्धन -कारीवणे, म्हसळा- काेल्टे ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

रायगड जिल्ह्यातील ८८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून ८४८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. १,५८८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. १० ग्रामपंचायती या बिनविराेध झाल्या आहेत.
-सर्जेराव म्हस्के पाटील, उपजिल्हाधिकारी, रायगड
 

Web Title: Ten Gram Panchayats unopposed; Withdrawal of 848 candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.