अपघातात दहा प्रवासी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:44 AM2018-03-28T00:44:58+5:302018-03-28T00:44:58+5:30
वाकण-पाली-खोपोली या राज्य मार्गावर गेली कित्येक वर्षांपासून अपघाताची मालिका सुरूच आहे
राबगाव/पाली : वाकण-पाली-खोपोली या राज्य मार्गावर गेली कित्येक वर्षांपासून अपघाताची मालिका सुरूच आहे. सध्या मार्गाचे दुपदरीकरणाचे काम जोरात सुरू असून कामात ठेकेदाराकडून कोणतीच सुरक्षितता बाळगली जात नाही. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी रोजी पाली-खोपोली मार्गावर नानोसे गावाच्या हद्दीत सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हल व ट्रकची समोरासमोर ठोकर झाली. अपघातात टेम्पो ट्रॅव्हलमधील दहा प्रवासी जखमी झाले असून ते सर्व खोपोलीतील रुग्णालयात उपचार घेत आहेत.
पालीकडून खोपोलीच्या दिशेन येणारा टेम्पो नानोसे गावच्या हद्दीत पोहचला असता पालीकडे येणारा ट्रक चालकाने रस्त्याचे रु ंदीकरणाचे काम चालू असताना बेदरकारपणे ट्रक चालवून टेम्पो ट्रॅव्हलला धडक दिली. यामध्ये टेम्पो ट्रॅव्हलमधील खंडू शांताराम सावंत, देवेंद्रकुमार दुबे, अमोल शिवाजी फडतरे, संतोषसिंग केदारसिंग रजपूत, प्रदीपकुमार मुखर्जी, राहुल मनोहर जाधव, मनोजकुमार कैलासचंद मोहती, शंकर लक्ष्मण कडू, सी.व्ही. मॅथ्यू, नागेश अशोक बहिरट आदी दहा प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खोपोली रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून पाली पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.