सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी दहा हजार फराळाचे बॉक्स
By वैभव गायकर | Published: October 9, 2023 04:28 PM2023-10-09T16:28:32+5:302023-10-09T16:29:44+5:30
आर्मी ऑफिसर्स पदार्थांची चाचणी करून प्रत्यक्ष हायर कॅम्प बॉर्डरवरच्या जवानांना ही पार्सल पाठवतील.
लोकमत न्युज नेटवर्क
पनवेल: भारत विकास परिषदने मातृभूमीच्या विविध सीमांचे रक्षण करणार्या सैनिकांना 10 हजार फराळाचे बॉक्स सीमेवर पाठवण्याचे लक्ष्य भारत विकास परिषद पनवेल ठेवले आहे. यासाठी 600 किलो चिवडा, 600 किलो शेव, 450 किलो चकली आणि 10 हजार लाडू आले आहेत.
येत्या दोन दिवसांत हे सर्व पदार्थ बॉक्समध्ये भरून सोमवार ते गुरुवार पर्यंत रेल्वे पार्सल तसेच एयर कार्गो मार्फत भारतीय लष्कराच्या आर्मी कॅम्पवर पोहचवण्यात येतील त्यानंतर आर्मी ऑफिसर्स पदार्थांची चाचणी करून प्रत्यक्ष हायर कॅम्प बॉर्डरवरच्या जवानांना ही पार्सल पाठवतील. या सर्व प्रक्रियेसाठी अंदाजे 10 ते 15 दिवस लागतात. सैनिक हो तुमच्यासाठी' हा भारत विकास परिषद, पनवेल शाखेचा प्रमुख प्रकल्प आहे, जो गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे आणि या उपक्रमामधे उत्तरोत्तर प्रगती होत आहे.
या उपक्रमाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी भेट देत नितिन कानेटकर, डॉ. किर्ती समुद्र,ज्योती कानेटकर, सुबोध भिडे यांच्याकडून सविस्तर माहिती घेत कौतुक केले. यंदाच्या वर्षी सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी 10 हजार फराळाचे बॉक्स पाठवणार असल्याचे सांगण्यात आले आहे.पनवेल शाखेची स्थापना 2019 साली झाली आणि 2020 मध्ये दिवाळीच्या निमित्ताने, भारत विकास परिषद ने या नवीन प्रकल्पाची सुरुवात केली व संकल्पनेला आपले ध्येय बनवले. सीमेवरील आपल्या सैनिकांना काही मिठाई (लाँग शेल्फ-लाइफ पौष्टिक लाडू) पाठवण्याचा निर्णय घेतला.