अलिबाग : दसरा मेळाव्यातून आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी शिंदे गट आणि उद्धव गट यांच्यात चढाओढ सुरू झाली आहे. शिंदे गटाच्या रायगड जिल्हा कार्यकारिणी बैठकिमध्ये दहा हजारहून अधिक कार्यकर्ते हे ५ ऑक्टोंबर रोजी मुंबई येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याला हजेरी लावणार असल्याचा निर्धार केला आहे. दसरा मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी अलिबाग येथे गुरुवारी २२ सप्टेंबर रोजी जिल्हा कार्यकारिणीची बैठक आयोजित केली होती. मेळाव्याला जाणाऱ्या कार्यकर्त्याची जाण्या येण्याची, खाण्या पिण्याची सर्व सुविधा करण्यात आलेली आहे. यासाठी सर्व पदाधिकारी यांनी आपापल्या स्तरावर नियोजन करून मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना शिंदे गटाच्या तीनही आमदारांनी केले आहे.
शिंदे गटाची रायगड जिल्हा कार्यकारिणी आढावा बैठक गुरुवारी २२ सप्टेंबर रोजी अलिबाग येथे आमदार महेंद्र दळवी यांच्या निवासस्थानी आयोजित केली होती. ५ ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या नियोजन साठी बैठक आयोजित केली होती. आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, उपनेत्या शीतल म्हात्रे यांनी आपल्या भाषणातून ठाकरे वर टीका केली आहे.
बाळासाहेब यांनी उभारलेला शिवसेना वटवृक्ष वाचविण्यासाठी आमचा उठाव
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जीवाच रान करून शिवसेना उभी केली. शिवसेनेचा वटवृक्ष बाळासाहेब यांनी उभा केला. मात्र हा वटवृक्ष सुकू लागल्याने आम्ही उठाव करून पुन्हा शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची उभी करणार आहोत. ठाकरे कुटुंबाचा दिवस हा टीका टिपण्णी शिवाय सुरू होत नाही. आम्ही ठेचा खाऊन मोठे झालो आहेत. ज्याचे अजून लग्न झाले नाही तो आम्हाला नामर्द म्हणतोय हे चुकीचे आहे असा टोला आदित्य ठाकरे यांना आमदार भरत गोगावले यांनी लगावून आमच्यावर टीका केली जात आहे. मात्र अंगावर आलात तर शिंगावर घेऊ असा इशारा शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी ठाकरेंना दिला आहे.
आमचेही आमच्या मतदार संघात स्वतचं अस्तित्व आहे. म्हणून आम्ही निवडून येत आहोत. आपण कधी आम्हाला ताकद दिलीत. प्रत्येक निवडणुकीला आम्ही सामोरे गेलो आहोत. तुमचं अस स्वतः कर्तुत्व काय आहे असा टोलाही गोगावले यांनी लगावला आहे. आम्ही दिल्लीत मुजरा करायला गेलो नव्हतो तर मेळाव्यासाठी गेलो होतो. दिल्लीत चहा वाल्याने तर राज्यात रिक्षा वाल्याने क्रांती केली आहे. रस्ते, गटार, इतर कामाला फोन आले की ओक्के आणि किती घेतलेत खोके असा आरोपही आमदार भरत गोगावले यांनी ठाकरेवर केला आहे.
हिंदुत्व विचाराचे मुख्यमंत्री बसल्याने आम्ही नाचलो
एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचा निर्धार घेऊन मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. यासाठी आम्ही आनंदाने नाचलो. उद्धव ठाकरे हे पायउतार झाले म्हणून नाचलो नाही. असे स्पष्टीकरण कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी टीकेला मेळाव्यात दिले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे सत्तापिपासू असून त्याच्याशी केलेली आघाडी आम्हाला मान्य नव्हती. स्वतः आणि कुटुंबासाठी केलेली आघाडी होती. आमचे बाप काढण्याआधी आपणच बाप बदलला त अशी टीका आमदार महेंद्र थोरवे यांनी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सर्व बडवे एकत्र येऊन आपल्या विरोधात लढणार आहेत. त्यामुळे निवडणुकीत शिवसैनिक यांनी आतापासूनच तयारील लागून भगवा फडकवायचा आहे. असा निर्धार थोरवे यांनी बोलून दाखविला.
रायगडला जेव्हा जाग येते तेव्हा इतिहास घडतो
छत्रपती शिवाजी महाराज याच्या स्वराज्याची राजधानी असलेला रायगड हा जिल्हा आहे. त्यामुळे रायगडला जेव्हा जाग येते तेव्हा इतिहास घडतो. असाच राज्याचा इतिहास हा रायगड मधून एकनाथ शिंदेच्या रूपाने घडला आहे. असे प्रतिपादन आमदार महेंद्र दळवी यांनी भाषणातून केले आहे. ज्या सरकारचे प्रतिनिधित्व केले त्याच्याच विरोधात उठाव अलिबागमधून झाला. केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी आधी उठाव केला होता. ते आता संपलेले आहेत. जिल्ह्याची राजकीय परिस्थिती वेगळ्या दिशेला चालू आहे. येणारी निवडणुका ह्या महत्वाच्या आहेत. आपले अस्तित्व सिद्ध करण्याची ही लढाई आहे. शेकाप हा संपलेला पक्ष आहे. तर इतर पक्षाचे नेतेही हतबल झालेले आहेत. शिंदे गटात येणारा ओघ हा वाढत आहे. मुख्यमंत्री आणि इतर मंत्री काम करीत आहेत. येणाऱ्या अडीच वर्षात जिल्ह्याचा राहिलेला बॅकलॉग भरून काढणार आहोत. रायगडचे स्वप्न साकारण्याची हीच वेळ आहे. जिल्ह्यात अडीच वर्ष विकास ठप्प झाला होता. शिवसेना वाढवायची असेल तर युवा सेनेला बळ देणे गरजेचे आहे. येणाऱ्या निवडणुकीत कुठेही कमी पडणार नाही. असा विश्वास दळवी यांनी शिवसैनिकांना दिला आहे.
टिटवी ही अशुभ असते
टिटवी ही अशुभ असते. ती जेव्हा ओरडते तेव्हा अशुभ होते. असा टोला माजी महापौर किशोरी पेडणेकर याना शिंदे गटाच्या उपनेत्या शीतल म्हात्रे यांनी लगावला आहे. पेडणेकर यांनी म्हात्रे याचा टिटवी म्हणून उल्लेख केला होता. त्यावर त्यांनी उत्तर दिले आहे. शिवसेनेतून गेलेल्या आमदाराची व्यथा ऐकल्यानंतर मी शिंदे गटात सामील झाल्याचे स्पष्टीकरण भाषणातून म्हात्रे यांनी दिले. जेव्हढा जन्म नाही तेव्हढ आमदार यांनी काम केले आहे. असा टोला आदित्य ठाकरे यांना म्हात्रे यांनी मारला आहे. आम्ही आमच्या आई बापाचे विचार ऐकले नाही पण बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालो. मात्र तुम्ही तर तुमच्या बापाचे विचार विकलेत. माझं घर माझं कुटुंब एव्हढेच केलेत. कोरोना काळात डॉक्टर झालात आता न्यायालयात फेऱ्या मारतात म्हणजे वकीलही होतील असा टोला ठाकरे यांना शीतल म्हात्रे यांनी लगावला आहे.