अलिबाग : रोहा शहरातील खालचा मोहल्ला येथे नदीकिनारी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा फरहाज अलिसाब नाडकर यास भादंवि कलम ३७६(आय)अन्वये दहा वर्षे सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरी, भादंविक ३७६ (जे) अन्वये दहा वर्षे सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरी, कलम ३६६ अन्वये ५ वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने सक्तमजुरी, कलम ३२४ अन्वये दोन वर्षे सक्तमजुरी व चार हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने सक्तमजुरी, कलम ५०६ अन्वये सहा वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना सक्तमजुरी अशी शिक्षा माणगाव सत्र न्यायालयाचे विशेष व सत्र न्यायाधीश राजेंद्र व्ही. लोखंडे यांनी मंगळवारी सुनावली आहे.
आरोपी फरहाज अलिसाब नाडकर याला झालेल्या दंडापैकी ५० हजार रुपये रक्कम पीडित मुलीस देण्याचा आदेश देऊन, हा गुन्हा केवळ पीडित मुलीवर केलेला नसून तो सर्व समाजाविरुद्ध केलेला गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे, असे विशेष व सत्र न्यायाधीश राजेंद्र व्ही. लोखंडे यांनी स्पष्टपणे निकालामध्ये नमूद केले आहे. दरम्यान, याच खटल्यातील दुसरा आरोपी राईश रफिक लद्दू यांस सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले आहे.
संपूर्ण रोहा शहरात खळबळ निर्माण करणारा हा बलात्काराचा गुन्हा रोहा शहराजवळच्या अष्टमी परिसरातील खालचा मोहल्ला येथे नदीकिनारी ६ एप्रिल २०१५ रोजी घडला होता. फरहाज नाडकर , राईश रफिक लद्दू त्यानेदेखील पीडित मुलीवर बलात्कार केला.या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.