व्हॉट्सअॅपवरील वादग्रस्त पोस्टमुळे तणाव
By admin | Published: March 18, 2017 04:00 AM2017-03-18T04:00:53+5:302017-03-18T04:00:53+5:30
खोपोली शहरात वादग्रस्त व्हॉट्सअॅप पोस्टवरून समस्त शिवप्रेमींचा संताप अनावर झाला. ही पोस्ट येथील केएमसी महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचे प्राध्यापक सुनील
वावोशी : खोपोली शहरात वादग्रस्त व्हॉट्सअॅप पोस्टवरून समस्त शिवप्रेमींचा संताप अनावर झाला. ही पोस्ट येथील केएमसी महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचे प्राध्यापक सुनील वाघमारे यांची असल्याचे स्पष्ट झाल्याने मोठ्या संख्येत शिवप्रेमींनी महाविद्यालयावर चाल करून संताप व्यक्त केला. वातावरण हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच महाविद्यालयात पोलिसांनी धाव घेत, वादग्रस्त पोस्ट टाकल्याप्रकरणी प्राध्यापक सुनील वाघमारे याला ताब्यात घेतले. तसेच संस्थेचे अध्यक्ष किशोर पाटील यांनी सुनील वाघमारे याला तत्काळ निलंबित करण्यात येत असल्याचे जाहीर केले.
शुक्र वारी सकाळपासून शिवाजी महाराजांच्या दोन जयंतीबाबत एक वादग्रस्त व्हॉट्सअॅप पोस्ट फिरत होती. अधिक तपासानंतर संताप निर्माण करणारी ती पोस्ट येथील केएमसी महाविद्यालयातील प्राध्यापक सुनील वाघमारे यांनी टाकली असल्याचे स्पष्ट झाले. याबाबतची माहिती खोपोली शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने हजारो शिवप्रेमींनी महाविद्यालयात धाव घेतली.
याबाबत जाब मागितला व तीव्र संताप व्यक्त करून प्राध्यापक वाघमारेवर कारवाई करा, नाहीतर आम्ही काय करायचे ते करतो, अशा घोषणा देत प्राध्यापक वाघमारे यांना जनतेच्या ताब्यात देण्याची मागणी केली. स्थिती अत्यंत नाजूक झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करीत प्राध्यापक सुनील वाघमारे याला ताब्यात घेतले. त्याही ठिकाणी शिवप्रेमी नागरिकांची प्रचंड गर्दी होऊन प्राध्यापक वाघमारेला जनतेच्या ताब्यात द्या, अशा घोषणा सुरू झाल्या. तासाभरानंतर तणावाचे वातावरण व संतप्त जमावाला शांत करण्यात पोलिसांना यश आले.
याबाबत प्राध्यापक वाघमारे यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, संस्थेचे अध्यक्ष किशोर पाटील यांनी प्रसंगाचे गांभीर्य बघून प्राध्यापक सुनील वाघमारे याला तत्काळ निलंबित करण्यात येत असल्याचे जाहीर केले. (वार्ताहर)
शिवप्रेमी, राजकीय नेत्यांनी के ला निषेध
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अश्लील व वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या प्रा.सुनील वाघमारेवर कडक कारवाईची मागणीसाठी खोपोलीतील हजारो शिवप्रेमी व विविध राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते यांनी के ली. शुक्रवारी दुपारी २ वाजेपर्यंत पोलीस स्टेशन आवारात ठाण मांडून निषेध व्यक्त के ला.