कशेडी बोगद्याच्या कंत्राटदाराच्या कार्यालयाचे टाळे काढल्याने तणाव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 06:41 AM2023-09-09T06:41:24+5:302023-09-09T06:41:31+5:30
सामूहिक राजीनामे देण्याचा भोगाव ग्रामपंचायतीच्या सदस्यांचा इशारा
पोलादपूर : येथील कशेडी बोगद्याचे काम करणाऱ्या शिंदे डेव्हलपर्स या कंपनीने येथे उभारलेल्या प्लॉन्टला भाडेकर न दिल्याने भोगाव ग्रामपंचायतीने बुधवारी दुपारी टाळे ठोकले होते; मात्र रात्री उशिरा पंचायत समिती प्रशासनाने हे टाळे उघडले. यामुळे भोगाव ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. शुक्रवारी पंचायत समितीवर धडक मोर्चा काढत ग्रामपंचायत सदस्यांनी सामूहिक राजीनाम्याचे अस्त्र उगारले आहे.
गणपती उत्सव तोंडावर असल्याने ग्रामस्थांनी सबुरी घेतली असून उत्सवानंतर उग्र आंदोलन करणार आहेत. शिंदे डेव्हलपर्सने जवळपास २६ लाख रुपये थकविले आहेत. यामुळे भोगाव ग्रामपंचायतीने या ठेकेदाराच्या प्लान्टसह जनरेटर व पेट्रोल पंप बुधवारी सील केला होता. मात्र रात्री अचानक सूत्रे फिरल्यानंतर गटविकास अधिकारी धनंजय जगताप यांनी महिला ग्रामसेविका भोसले यांना सील काढण्याचे तोंडी आदेश दिले. त्यानंतर हा प्लॉन्ट खुला करण्यात आला आहे. मात्र यामुळे भोगाव ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
ग्रामपंचायत सदस्यांनी गटविकास अधिकारी यांनी दिलेले आदेश बेकायदेशीर आहेत. शुक्रवारी त्यांनी पंचायत समितीवर मोर्चा काढत गटविकास अधिकारी हटावचा नारा दिला आहे. माजी सरपंच राकेश उतेकर यांनी गणपतीपूर्वी योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी मागणी केली आहे.
आमदारांची मध्यस्थी
शिंदे डेव्हलपर्स हे कशेडी बोगद्याचे काम करीत आहेत. ग्रामस्थांच्या भूमिकेमुळे बोगद्याच्या कामावर परिणाम होणार असल्याने आमदार भरत गोगावले यांनी सुपुत्र विकास गोगावले व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रकांत कळंबे यांना ताबडतोब पंचायत समितीमध्ये पाठवले. त्यांनी भोगाव ग्रामपंचायतच्या पाणी व रस्त्याची सुविधा येत्या पाच-सहा दिवसात संबंधित ठेकेदाराने करून द्यावी. गणपतीपर्यंत ग्रामस्थांनी शांत रहावे, अशी समजूत काढली.