कर्जत : शहरातील कर्जत एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम शाळेचे मुख्याध्यापक व संचालक मंडळाच्या गलथान कारभाराविरुद्ध पालक संघर्ष समितीने बेमुदत साखळी उपोषण सुरू केले होते. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची लोकप्रतिनिधी आणि पालकांनी भेट घेतल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष तपासणी करावी शाळेच्या चुकांमुळे मुलांचे नुकसान होऊ नये अशी कार्यवाही करावी असा आदेश संबंधित विभागाला दिला. यामुळे मुलांचे अतिरिक्त गुण मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याने संघर्ष समितीने उपोषण स्थगित केले.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चौकात पालक संघर्ष समितीच्यावतीने ५६ विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळावेत, शाळेच्या आवारातील शौचालय साफसफाई, स्वच्छता, शुद्ध पाणी, शाळेच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, शाळेमध्ये मुलींसाठी सॅनिटरी पॅड मशिन बसविणे, क्रीडा मैदान उपलब्ध करणे, सिक्युरिटी नियुक्त करणे, दरवर्षी वाढविण्यात येणाऱ्या फी वाढीवर निर्बंध आणणे, शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना होणारा मानसिक त्रास थांबविणे व शाळेतील शिक्षकांची मुले व इतर मुलांच्यात केला जाणारा भेदभाव थांबविणे, दरवर्षी नियुक्त केल्या जाणाºया पालक प्रतिनिधी व शाळा व्यवस्थापन समितीवरील पालकांना विशेष अधिकार मिळावेत, शाळेतील शिक्षकांची शैक्षणिक पात्रता तपासून प्रशिक्षित शिक्षकांची नेमणूक करावी तसेच शाळेचे मुख्याध्यापक व बेजबाबदार संचालक मंडळाने राजीनामा द्यावा या मागण्यांसाठी २मे रोजी सकाळी १० वाजता बेमुदत साखळी उपोषण सुरू केले होते. याप्रसंगी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, नगरसेवक सोमनाथ ठोंबरे, नगरसेविका स्वामिनी मांजरे, काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष विजय हरिश्चंद्रे, मनसेचे प्रसन्न बनसोडे आदींनी भेटी दिल्या.
या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आमदार सुरेश लाड, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, भाजपा जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, किसान मोर्चाचे प्रदेश चिटणीस सुनील गोगटे, भाजप तालुका चिटणीस पंकज पाटील, पालक प्रतिनिधी पंकज ओसवाल, संस्थेचे चेअरमन डॉ. अनिरुद्ध जोशी, सदस्य प्रवीण गांगल आदींनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन चर्चा केली. त्यावर तावडे यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष तपासणी करावी. शाळेच्या चुकीमुळे मुलांचे नुकसान होऊ नये अशी कार्यवाही करावी, असे लेखी आदेश महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाला दिले. त्यानंतर आमदार सुरेश लाड, डॉ. अनिरुद्ध जोशी, प्रवीण गांगल आदी रात्री १० वाजता उपोषण स्थळी आले. त्यांनी उपोषणकर्त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली, परंतु उपोषणकर्ते ठाम होते. त्यानंतर सविस्तर चर्चा होऊन संघर्ष समितीने उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आणि आमदार लाड यांच्या हस्ते शीतपेय घेऊन उपोषण स्थगित केले. यावेळी माजी नगराध्यक्ष शरद लाड, संस्थेचे पदाधिकारी सतीश पिंपरे, शेखर शहासने, सायली शहासने आणि पालक, नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.
अन्य मागण्यांबाबत पालक संघर्ष समितीने उपोषणाचा मार्ग न धरता संस्था चालकांबरोबर चर्चा करून मार्ग काढावा असे आमदार सुरेश लाड यांनी सूचित केले. त्यावर रविवारी ५ मे रोजी पालक व संस्थेचे पदाधिकारी यांची सभा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सभेस आमदार लाडही उपस्थित राहणार आहेत.