मधुकर ठाकूर, उरण: बोकडवीरा-उरण येथील महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या वायु विद्युत केंद्रातील (जीटीपीएस) वीज निर्मितीच्या ए-२ युनिटमधील स्टीम बॉयलरमध्ये झालेल्या भीषण स्फोटात तरुण अभियंता विवेक धुमाळे (३५) यांचा होरपळून दुदैवी मृत्यू झाला आहे. तर दोन कामगार गंभीररित्या होरपळून जखमी झाले आहेत.जखमींवर ऐरोली येथील बर्न इस्पितळात उपचार सुरू असल्याची माहिती प्रकल्पाचे मुख्य अभियंता सुनील इंगळे यांनी दिली.
उरण तालुक्यातील बोकडवीरा ग्रामपंचायतीच्या हद्दीत महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे ६७२ मेगावॉट वीजनिर्मितीचे वायु विद्युत केंद्र आहे.या प्रकल्पातील ए-२ युनिट मागील सहा महिन्यांपासून बंद पडले आहे. या बंद युनिटच्या दुरुस्तीनंतर मागील तीन चार दिवसांपासून ट्रायल बेसवर सुरू करण्यात आला आहे.रविवारी या युनिटमधील एचपीबीसीडी या स्टीम पंप लिकेज झाले होते. त्या लिकेजची पाहणी करण्यासाठी दुदैवी अभियंता विवेक धुमाळे आणि दिपक यशवंत पाटील के.के.पाटील हे दोन कामगार गेले होते.
या पंपातून सुमारे २५० ते ३०० डीग्री सेल्सिअस इतके स्टीम वॉटर बॉयलरमध्ये सर्कुलेट केले जाते.याच ए-२ युनिटमधील एचपीबीसीडी पंपात रविवारी दुपारी १२.२० वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला.या स्फोटात अभियंत्यासह दोन कामगार स्टीम वॉटर मध्ये सापडून होरपळले आहेत. गंभीररित्या होरपळून जखमी झालेल्या तीनही कामगारांना उपचारासाठी तातडीने ऐरोली येथील बर्न इस्पितळात दाखल करण्यात आले.मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी अभियंता विवेक धुमाळे मृत्यू झाल्याचे सांगितले.अन्य दोन्ही कामगारांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती प्रकल्पाचे मुख्य अभियंता सुनील इंगळे यांनी दिली.
चार किमी परिसरात कानठळ्या बसल्या!
स्फोटाची तीव्रता प्रकल्पाच्या चार किमी परिसरापर्यत जाणवली.कानठल्या बसविणाऱ्या या स्फोटाच्या आवाजाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.या घटनेची माहिती मिळताच अनेकांनी प्रकल्पाकडे धाव घेऊन स्फोटात आपला कुणी नातेवाईक तर नाही ना याची खातरजमा करून घेत होते.तर या प्रकल्पात याआधीही अशाप्रकारच्या घटना घडल्या आहेत.अनेकांनी या घटनेसाठी प्रकल्पातील सुरक्षा यंत्रणेला दोष दिला.
अभियंता विवेक धुमाळे हे स्पोर्ट्समन होते.आपल्या कामातही ते नेहमी तत्पर होते.प्रकल्पातील कामगारांमध्येही लोकप्रिय होते.त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन वर्षांची मुलगी असल्याचे कामगारांकडून सांगितले जात आहे.अशा या हसतमुख अभियंत्यांच्या दुदैवी मृत्यूमुळे कामगारांतुन हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाला उशिराने जाग
स्फोटाची घटना रविवारी दुपारी १२.२० वाजताच्या सुमारास घडली.मात्र दुदैवी घटनेनंतर अडीच तासानंतरही तहसील, पोलिस प्रशासनाचा एकही अधिकारी घटनास्थळी दाखल झाला नव्हता. प्रशासनाच्या असंवेदनशील कृतीमुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात होती.