- गणेश प्रभाळेदिघी - वाघाच्या नावाने अनेकांचा थरकाप उडतो. श्रीवर्धन तालुक्यातील दांडगुरी येथे गुरुवारी रात्रीच्यावेळी परिसरात असलेल्या झुडपांमध्ये वाघाचे दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. रात्री च वनविभागाने दखल घेत भेट दिली व वाघ सदृश प्राणी असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आता सदर वाघाने आपला मोर्चा रहिवासी परिसरात वळविल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील दांडगुरी परिसर म्हणजे जंगल क्षेत्राला जोडून असणारे गाव, तसे थंड वातावरण असलेले परिसर म्हणून याठिकाणाला ऐतिहासिक प्रसिद्धी आहे. विशेष म्हणजे सदर वाघ दिसल्यापासून सर्वांना खबर लागल्याने परिसरात आणखीच दहशत निर्माण झाली असून कोणत्याही परिस्थितीत वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दांडगुरी, वाकलघर, आसुफ तसेच बोर्ला भागात मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल आहे. याभागात नदी देखील वाहत आहे. त्यामुळे या परिसरात वाघासह इतर प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याचे समजते आहे.
कोरोनाच्या दहशतीमध्ये सर्व लोक असतांना आता लोकांना वाघोबाचे दर्शन होत असल्याने सर्व नागरिक घाबरलेल्या स्थितीत आहेत. रात्री 10.00 वाजेच्या सुमारास दांडगुरी परिसरात देखील वाघाचे दर्शन झाले. या घटनेची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी मिलिंद राऊत यांना देण्यात आली. यामध्ये बोर्ली राउंड पथकाचे बुरान शेख, प्रतीक गजेवार, एल. एम. गिराने यांनी घटनास्थळी भेट दिली. व संशयित प्राण्याचे ठसे घेऊन वनविभागाकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
सद्या वाघ जंगल सोडून मानववस्तीत आल्याने नागरिकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाच्या दहशतीमुळे जंगल परिसरातील लोकांचे जगणे मुश्किल होऊन बसले आहे, शेतीची हंगामी कामे करणे, किंवा मिळेल ते काम करून आपला प्रपंच चालविणे, ही या लोकांची कामे संपूर्णपणे लॉक डाउन व वाघाच्या भीतीमुळे खोळंबली जाणार आहेत. मात्र वनविभागाकडून जोपर्यंत वाघाचा बंदोबस्त लावला जात नाही, तोपर्यंत गावकऱ्यांमधील भीतीचे वातावरण दूर होणार नाही, हेही तितखेच खरे आहे.
आम्ही घटनास्थळी गेलो असता संशयित प्राण्याचे ठसे उमटले होते. तपासासाठी पुढे पाठवले आहेत. नागरिकांनी जागरूक राहावे. गुरांना आपल्या गोठ्यात बांधून ठेवावे. याघटनेमुळे वनविभाग सतर्क राहील.- मिलिंद राऊत, वनपरिक्षेत्र अधिकारी, श्रीवर्धन
गुरुवारी रात्रीच्या वेळी बाइकस्वाराने वाघ दिल्याचे सांगितले आम्ही तात्काळ तिकडे गेलो असता वाघ पळून गेल्याचे निदर्शनास आले मात्र काळोख असल्याने पुढे गेलो नाही. तात्काळ वनविभागाला कळविले व अधिकाऱ्यांनी देखील भेट दिली.- ग्रामस्थ, दांडगुरी.