-निखिल म्हात्रे अलिबाग : श्वानदंशाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, रायगड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भटक्या कुत्र्यांबरोबर राखनदार कुत्र्यांचीही दहशत आहे. मागील ११ महिन्यांत तब्बल ७०५ जणांना कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. श्वानदंशाचे प्रमाण दरवर्षी ५० टक्क्याने वाढत असल्याने रायगड जिल्ह्यात श्वानदंशाची बाब गंभीर झाली आहे.श्वानदंशाचे प्रमाण दरवर्षी वाढत असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येत. ग्रामीण भागात राखनदार कुत्रे, तर शहरी भागात मोकाट कुत्र्यांची दहशत कायम आहे. दिवसाला साधारण ६१ जणांना कुत्र्यांच्या हल्ल्याला सामोरे जावे लागत असल्याने ‘भय येथील संपले नाही’ अशीच स्थिती आहे. मोकाट कुत्रांच्या दहशतीने शहरी भागात रात्रीचा फेरफटका मारणेही कठीण झाले आहे. रात्रपाळी संपवून येणाऱ्या कामगारांना याचा जास्तच त्रास जाणवत असतो. याचबरोबर राखनदार कुत्र्यांची दहशत वाढत आहे.
कुत्रे पकडण्यासाठी काय व्यवस्था आहे?मोकाट फिरणारे कुत्रे पकडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
प्रशासनाने लगाम घालण्याची मागणीजिल्हा प्रशासनाने आता तरी या मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांना लगाम घालण्यासाठी व्यवस्था करावी, अशी मागणी जनसामान्यांतून होत आहे. राखण करण्यासाठी विशिष्ट जातीचे कुत्रे पाळले जातात. हे कुत्रे अचानक हल्ला करीत असल्याने त्यांच्या हल्ल्यातून बचाव करणे कठीण जात आहे.
सूचनाफलक गरजेचे :- नव्याने येणाऱ्या व्यक्तीला येथे राखण करण्यासाठी कुत्रा असल्याचे माहिती होण्यासाठी ‘सावधान! येथे कुत्रा आहे’ अशा आशयाचे फलक लावणे गरजेचे आहे. किंवा कुत्र्याला बंदिस्त जागेत व्यवस्थित बांधून ठेवणे आवश्यक आहे. यामुळे कुत्र्यांकडून अचानक होणारे हल्ले कमी होतील.भुरटे चोर, फळपिकांची चोरी करणारे चोरटे यांना दहशत बसावी म्हणून राखण करण्यासाठी कुत्रे ठेवणे सोयीचे ठरते. नवीन येणाऱ्या व्यक्तींच्या अंगावर धावून जाण्याचेच प्रशिक्षण त्यांना देण्यात आलेले असते. परंतु अनेकवेळा बाजूने बेसावधपणे जाणाऱ्यांवरच झडप घालतात. - लावेश नाईक, नागरिक रायगड जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यांचे प्रकार काही प्रमाणात वाढत आहेत. पाळलेल्या कुत्र्याला रेबीज लस नियमितपणे मालक देतात. वाढलेल्या घटनांमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीचा जादा साठा ठेवण्यात येतो. जिल्हा सामान्य रुग्णालयात आलेल्या रुग्णालाही लस देतो. - डॉ. राजीव तंबाळे, वैद्यकीय अधिकारी, सामान्य रुग्णालय.