नेरळ : शंभर वर्षे पूर्ण केलेल्या नेरळ-माथेरान मिनीट्रेनमध्ये मध्य रेल्वेने मध्यंतरीच्या काळात अनेक आमूलाग्र बदल केले आहेत. माथेरानमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने हे पाऊल उचलले आहे. माथेरानच्या राणीच्या ताफ्यात जगातील स्वित्झर्लंड देशासारखे विस्टाडोम डबे दाखल झाले होते. त्या डब्यांची शनिवारी चाचणी घेतली गेली. या चाचणी वेळी शंभरी पूर्ण केलेले वाफेचे इंजिनदेखील जोडण्यात आले होते. मोठ्या खिडक्या, पारदर्शक छत, दोन एसी या डब्यात आहेत, त्या सोबत एलईडी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्हीदेखील या डब्यात लावण्यात आलेले आहेत.
एकंदर माथेरानच्या निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांना निसर्गसमृद्ध माथेरानचा मनमुराद आनंद आता नेरळपासून घेता येणार आहे. याच वेळी मध्ये रेल्वेच्या ताफ्यात आजही असलेल्या ७९४ बी या वाफेच्या इंजिनाला १०० वर्षे पूर्ण झाल्याने रेल्वे कर्मचाºयांनी केक कापून आपला आनंद साजरा केला. पर्यटक प्रवाशांना घाटमार्गाने प्रवास करताना आसपासचा निसर्ग न्याहाळता यावा आणि त्याच वेळी आकाश न्याहाळता यावे म्हणून नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेनच्या ताफ्यात विस्टाडोम प्रवासी डबे बनविण्यात आले आहेत. त्या प्रवासी डब्यांची चाचणी शनिवार, २३ फेब्रुवारी रोजी नेरळ स्थानकात घेण्यात आली.
नेरळ-माथेरान-नेरळ ही नॅरोगेज ट्रॅकवर चालणाºया मिनीट्रेनचा प्रवास आणखी आकर्षक करण्याचा मध्य रेल्वेचा प्रयत्न आहे. त्यासाठी पक्षी, प्राणी, माथेरानचे निसर्ग सौंदर्य याने नटलेले प्रवासी डबे आणण्यात आले आहेत, त्यातील प्रवासी डबे हे वातानुकूलित असून, प्रवासी डब्याला पर्यटक प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने पारदर्शक प्रवासी डबे वापरण्याचे धोरण जाहीर केले होते. विस्टाडोम प्रवासी डबे नेरळ लोकलमध्ये आणण्यात आले आहेत. ते वातानुकूलित पारदर्शक डबे लावून प्रवासी सेवा देण्यासाठी इच्छुक असलेल्या रेल्वे प्रशासनाने शनिवार, २३ फेब्रुवारी रोजी एक विस्टाडोम प्रवासी डब्बा लावलेली मिनीट्रेन नेरळ स्थानकातून चालविण्यात आली. विस्टाडोम प्रवासी डब्याला साजेसे असे इंजिनदेखील लावण्यात आले होते.डब्यात असणार या सुविधाच्विस्टाडोम प्रवासी डब्यातून प्रवाशांना आकाश न्याहाळता येणार आहे, त्याच वेळी आजूबाजूचा परिसरही बघण्यासाठी मोठ्या काचा असलेल्या खिडक्या असून त्या प्रवासी डब्यात बसण्यासाठी आसन व्यवस्था आधुनिक दर्जाची बसविण्यात आली आहे. तर एलईडी टीव्ही, वातानुकूलित यंत्र, थंड पाण्यासाठी फ्रीजदेखील असणार आहे. या विस्टाडोम प्रवासी डब्यात असलेली आसने ही मागे-पुढे होऊ शकतात, तसेच बेडसारखी सरळदेखील होऊ शकतात. त्यामुळे या विस्टाडोम प्रवासी डब्याविषयी पर्यटकांमध्ये उत्सुकता असून चाचणी घेऊन प्रवासी सेवेत आणण्याचा मध्य रेल्वेचा प्रयत्न आहे. मात्र, यासाठी प्रवाशांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.