उरणच्या खोपटा पुलावर लिहिला दहशतवाद्यांशी संबंधित मजकूर!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 03:24 AM2019-06-04T03:24:13+5:302019-06-04T03:24:30+5:30
समुद्रात गस्त वाढवली : सुरक्षा यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश
उरण : तालुक्यातील खोपटा पुलाच्या एका खांबावर दहशतवाद्यांशी संबंधित मजकूर आणि काही आकृत्या काढल्याचे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मजकुरामध्ये ‘इसिस’, तसेच दहशतवादी अबू-बकर-अल-बगदादीचा उल्लेख असल्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. रविवारी उरण पोलिसांना माहिती याबाबत मिळाल्यानंतर, चौकशी आणि तपास सुरू करण्यात आल्याची माहिती व.पो.नि. जगदीश कुलकर्णी यांनी दिली.
उरण तालुक्यात ओएनजीसी, नौदलाचे शस्त्रागार, जेएनपीटी, विद्युत केंद्र असे संवेदनशील व महत्त्वाचे प्रकल्प असल्याने या संदेशाला महत्त्व प्राप्त झाले आहे. काळ्या रंगाच्या मार्करने तीन भागांत हे संदेश लिहिले आहेत. यात ‘धोनी जन्नत मे आउट’ असा उल्लेख असून, ‘आम आदमी पार्टी’, ‘केजरीवाल’, ‘हाफिज सईद’, ‘रहिम कटोरी’, ‘राम कटोरी’ अशी नावे लिहिली गेली आहेत, तसेच देवनागरी व इंग्रजी भाषेत सांकेतिक आकडे लिहिले आहेत.
पुलाच्या खांबावर एक आकृती काढली असून, त्यामध्ये इम्पोर्ट-एक्सपोर्ट जहाजे, बंदर (जेएनपीटी), विमानतळ, पेट्रोल पंप दाखविण्यात आले आहेत, तर दुसऱ्या एका आकृतीत कुर्ला, गोरखपूर असा उल्लेख करण्यात आलेला आहे. हस्ताक्षरावरून आणि मजकुरातील भाषेवरून हा मजकूर स्थानिकांनी लिहिला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
याबाबत सगळ्या शक्यता तपासून पाहत असून, त्या दिशेने तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून समुद्रात गस्त वाढविण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे व.पो.नि जगदीश कुलकर्णी यांनी दिली.