उरण ग्रामीण भागातील वीजेची समस्या दूर करण्याची ठाकरे गटाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2023 05:09 PM2023-08-11T17:09:00+5:302023-08-11T17:10:05+5:30
१० ग्रामपंचायत हद्दीतील गावात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे रहिवासी हैराण.
मधुकर ठाकूर, उरण : उरण पुर्व विभागातील ग्रामीण भागातील १० ग्रामपंचायत हद्दीतील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने नागरिकांची होणारी गैरसोय तत्काळ दूर करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (११)शिवसेनेचे ( उध्दव बाळासाहेब ठाकरे गट ) तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांनी उरण महावितरणचे उप अभियंता विजय सोनवणे यांची भेट घेतली.
उरण पुर्व विभागातील चिरनेर, कळंबुसरे, कोप्रोली, बांधपाडा, पिरकोन, सारडे, वशेणी, पुनाडे,आवरे, गोवठणे आदि ग्रामपंचायत हद्दीतील गावातील वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.सातत्याने खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे गृहीणी,छोटे-मोठे व्यावसायिक, रुग्ण,नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होऊ लागली आहे. गणेशोत्सव जवळ येऊन ठेपला आहे.त्यामुळे चिरनेरच्या कलानगरात सुमारे २५-३० गणपतीच्या मूर्ती घडणारे कारखानदार आणि काम करणाऱ्या शेकडो मुर्तीकारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे मुर्तीकार चांगलेच त्रस्त झाले आहेत.
उरणच्या ग्रामीण भागातील गावांतील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (११) शिवसेनेचे ( उध्दव बाळासाहेब ठाकरे गट ) तालुका प्रमुख संतोष ठाकूर तसेच पुर्व विभागातील काही पत्रकारांनी उरण महावितरण विभागाचे उप अभियंता विजय सोनवणे यांची भेट घेतली.यावेळी तालुकाप्रमुख संतोष ठाकूर व पत्रकारांनी वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्या संदर्भात तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली.तसेच बांधपाडा व दिघोडे ग्रामपंचायत हद्दीत नव्याने सब स्टेशन उभारण्याची तसेच भेंडखळ खाडीतील केबल तसेच विद्युत पोल रस्त्यालगत हलविण्याचीही मागणी केली.चर्चेअंती उप अभियंता विजय सोनवणे यांनी गणेशोत्सवात विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सध्या महावितरण कंपनीचे कर्मचारी काम करीत असल्याचे सांगितले.तसेच वीजेची सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील असे आश्वासनही त्यांनी सकारात्मक झालेल्या चर्चेनंतर दिले.